हेमांगीचं असंही थँक्यू

यशाची घोडदौड कितीही वेगवान झाली तरी योग्य टप्प्यावर मागे वळून पाहात आपल्या प्रवासात वाटेकरी ठरलेल्या लोकांची आठवण ठेवावी. अनेकदा पुस्तकात, साहित्यात हे वाक्य म्हणून वाचायला मिळते. पण अशी वाक्ये पुस्तकाच्या पानापेक्षा वैयक्तिक आयुष्यात जर अंगीकारली तर खऱ्या अर्थाने अशा वाक्यांचा एक सुंदर विचार होतो . कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्यांच्यामुळे आपण एक एक पायरी वर चढत गेलो त्यांची आठवण ठेवणे हे उत्तम व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे. हे सगळे सांगण्याचे निमित्त म्हणजे अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिने लेखक दिग्दर्शक विजू माने यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे. पडद्यावरचे कलाकार नेहमीच सेलिब्रिटी म्हणून मिरवत असतात; पण या पडद्यामागच्या कलाकारांना मोठं करण्यासाठी, प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी पडद्यामागचं कौशल्यही तितकंच महत्त्वाचं असतं. विजू माने हे व्यक्तिमत्त्व पडद्यामागे राहून अनेक कलाकृतींच्या यशाचे शिलेदार बनले आहेत. हेमांगी कवी हिच्या अभिनय कारकीर्दीमध्येही विजू माने यांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यांचीच आठवण तिने एका सुंदर फोटोसोबत शेअर केली आहे.

वेगळ्या धाटणीचे काम करणाऱ्या कलाकारांच्या यादीत हेमांगी कवी हिचं नाव घेतलं जातं. एक संवेदनशील माणूस आणि तितकीच कसदार अभिनेत्री या दोन्ही गोष्टींचा संगम हेमांगीमध्ये आहे. ती पडद्यावर अभिनेत्री म्हणून जितकं काळजाला भिडेल असं काम करते तितकीच ती समाजामध्ये घडत असलेल्या चुकीच्या गोष्टींबद्दल, अयोग्य गोष्टींबद्दल माणूस म्हणूनही भाष्य करत असते. अभिनय करत असताना कलाकाराला एक मुखवटा घ्यावा लागतो. ते त्याचं काम असतं; पण समाजामध्ये वावरत असताना तो मुखवटा बाजूला सोडून खऱ्या चेहऱ्याने आणि खऱ्या मताने वावरण्यामध्ये हेमांगी कवीचा हात कोणी धरू शकत नाही. हेमांगीची अभिनयाची कारकीर्द ही प्रायोगिक नाटकापासून सुरू झाली. इतकंच नव्हे तर अभिनयाची बाराखडी तिला विजू माने यांच्या तालमीत शिकायला मिळाली, असे सांगत तिने तिच्या सोशल मीडिया पेजवर विजू मानेंसोबत फोटो शेअर करत त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाला सलाम ठोकला आहे. या फोटोसोबत हेमांगीने लिहिलेल्या कॅप्शनमध्ये ती असं म्हणते की, विजू माने ही व्यक्ती माझ्या अभिनय कारकिर्दीची एक अशी साक्षीदार आहे जिने मी काहीच नसणं आणि मी खूप काही असणं या दोन्ही मधल्या रिकाम्या जागा भरताना पाहिले आहे.

विजू माने यांची लेखणी अभिनय क्षेत्रातील अनेकांना माहिती आहे. त्यांच्या लेखनातून कागदावर उमटलेल्या अनेक नाटकांचा मी भाग बनले. ही नाटकं केवळ मला अभिनेत्री म्हणून घडायला मदत करणारी नव्हती तर प्रत्येक भूमिकेकडे पाहण्याची सजग नजर आणि त्या भूमिकेमधून मी स्वतःला आणि समाजाला काय देऊ शकते ही जाणीव मला विजू माने यांच्यासोबत काम केलेल्या प्रत्येक नाटकाने प्रत्येक सिनेमाने दिली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी माणसं योग्य वेळी येणं आवश्यक असतं. मला माझ्या योग्य वळणावर विजू माने यांच्यासारखी माणसे भेटत गेली आणि म्हणून मी अभिनयामध्ये मला स्वतःला आणि माझ्या प्रेक्षकांना समाधान देणारे काम करू शकले.

हेमांगी कवी जितकी विनोदी स्किटमध्ये पोट धरून हसवते तितकीच ती एखाद्या गंभीर दृश्यात अंतर्मुख करून जाते. हिंदीमध्येही हेमांगी कवीने अभिनयाची चुणूक दाखवली आहे. सिनेमा, नाटक, मालिका आणि वेबसीरिज अशा प्रत्येक माध्यमांमध्ये अभिनेत्री म्हणून स्वतःला मोल्ड करत तिने त्यात या माध्यमाचा चेहरा बनण्यासाठी अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक स्वच्छतागृहात असलेल्या कमोडचा वापर पुरुषांकडून चुकीच्या पद्धतीने केला जातो, ज्याचा महिलांना काय त्रास होतो या विषयावर हेमांगी कवीने सोशल मीडियामध्ये मुद्दा उपस्थित केला होता. यावरूनदेखील हेमांगी कवी चर्चेत आली होती. तिने उपस्थित केलेल्या या मुद्द्याला मनोरंजन क्षेत्रातीलच नव्हे तर विविध क्षेत्रांतील पुरुष आणि स्त्रियांनी पाठिंबा दिला होता.

तिने ज्या विजू माने यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आपल्या भावना शेअर केल्या आहेत ते विजू माने हे पडद्यामागील विविध धुरा सांभाळणारे व्यक्तिमत्त्व आहेत. ती रात्र ,गोजिरी, मंकीबात या त्यांच्या सिनेमातून विजू माने यांची दमदार लेखणी व दिग्दर्शन प्रेक्षकांपर्यंत पोहचलेले आहे. हेमांगी कवी हिने व्यक्त केलेल्या या भावनेला तिच्या चाहत्यांनीदेखील सॅल्युट केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER