नरेंद्र मोदी एक खंबीर नेतृत्व; अमेरिका भारताची सदैव ऋणी असेल- डोनाल्ड ट्रम्प

Thank you India and PM Modi decision on HCQ- donald trump

नवी दिल्ली : अमेरिकत कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. अमेरिकेची गरज लक्षात घेऊन भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा करण्यासाठी मंजुरी दिली आहे.

भारताच्या या निर्णयामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आनंदित झाले असून ट्रम्प यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आणि नरेंद्र मोदी यांचे ट्विट करून आभार मानले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी एक खंबीर नेतृत्व आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या मदतीसाठी अमेरिका भारताची सदैव ऋणी असेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

“कठीण काळात मित्रांकडून विशेष मदतीची गरज असते. हायड्रोक्सीक्लोरोक्वीनसंबंधी घेतलेल्या निर्णयाबद्दल भारत आणि भारतीय लोकांचे आभार. ही मदत अमेरिका कधीही विसरू शकत नाही. या लढाईत आपल्या मजबूत नेतृत्वाने फक्त भारतीय नाही तर माणुसकीची मदत करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार.” असे ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

याआधी ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींना फोन करून कोरोनाविरोधातील लढाईत मदत मागितली होती. सोबतच भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा केला नाही तर प्रत्युत्तर दिलं जाईल, असा धमकीवजा इशाराही दिला होता. पण भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक भाषा बदलली आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींचं तोंडभरून कौतुक केलं आहे. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी महान नेता असल्याचंही म्हटलं आहे.

तर बुधवारी ट्विट करून जाहीरपणे ट्रम्प यांनी भारतवासी आणि पंतप्रधानांचे भरभरून कौतुक केले आहे.