कृतज्ञ रोमेन ग्रोजॉन म्हणाला, ‘थँक यू फॉर सेव्हिंग माय लाईफ!’

Romain Grosjean

गेल्या रविवारी बहारीन ग्रँड प्रिक्समधील (Baharin Grand Prix) भयानक अपघातात बालंबाल बचावलेला फॉर्मुला वन (Formula One) रेसिंगपटू, फ्रान्सचा (France) रोमेन ग्रोजॉन (Romain Grosjean) चारच दिवसात बहारीन ट्रॅकवर परतला आहे आणि त्याने त्या दूर्घटनेत त्वरेने आणि वेळीच धावून मदत करत आपले प्राण वाचविणाऱ्या सर्वांना धन्यवाद दिले आहेत.

या अपघातात स्फोट होऊन रोमेनच्या कारचे दोन तुकडे झाले होते, रोमेनची कार जळून खाक झाली होती आणि वेळीच मदत मिळाली नसती तर त्याचे वाचणे अशक्य होते पण फॉर्मुला वनची मेडिकल टीम व बहारीन इंटरनॅशनल ट्रॅकवरील मार्शल्सनी अतिशय वेगाने मदतकार्य करत रोमेन ग्रोजॉनला बाहेर काढले होते. केवळ नशिब बलवत्तर म्हणून या अपघातात बचावलेल्या रोमेनच्या दोन्ही हाताला व डाव्या पायाला किरकोळ भाजले होते आणि त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरु होते मात्र दवाखान्यातून कालच सुटी मिळाल्यावर त्याने आपले प्राण वाचविणाऱ्या सर्वांची भेट घेऊन त्यांना ‘थँक यू फॉर सेव्हिंग माय लाईफ’ म्हणत धन्यवाद दिले आहेत. हात बँडेजमध्ये गुंडाळलेले असतानाच रोमेनने ही कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मदतकार्यात जे सर्वात पुढे होते आणि पेटत्या कारमधून ज्यांनी रोमेनला बाहेर पडण्यासाठी हात दिला होता ते मेडिकल टीमचे अॕलन व्हॕन डर मर्व्ह यांना तर अलिंगन देत रोमेनने आभार व्यक्त केले. एफआयए मेडिकल टीमचे इयान रॉबर्टस् यांनाही त्याने धन्यवाद दिले आहेत. हे दोघेच स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याच्या मदतीसाठी पुढे होते. एवढेच नाही तर हास फॉर्म्युला वन टीमसाठी तो अबूधाबी ग्रँड प्रिक्समध्येसुध्दा 11 ते 13 डिसेंबरदरम्यान भाग घेण्याच्या तयारीत आहे.

सध्या हास फॉर्मुला वन टीममध्ये साखीर ग्रँड प्रिक्ससाठी ग्रोजॉनची जागा पिएत्रो फिट्टीपाल्डीने घेतली आहे पण वर्षातील शेवटची ग्रँड प्रिक्स, अबुधाबी स्पर्धेत भाग घेण्याची ग्रोजॉनला आशा आहे. तो शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तयार असला तरच हे होईल, पण त्याने वर्षाच्या शेवटच्या रेसमध्ये खेळावे अशी आमची इच्छा आहे असे हास एफ वन टीमचे प्रमुख गुंथर स्टेनर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बहारीनच्या त्याच मैदानावर पण वेगळ्या ट्रॅकवर रविवारी साखीर ग्रां प्री होणार आहे. मात्र या ट्रॅकमध्येही ग्रोजॉनच्या कारला जिथे अपघात झाला ते पहिल्या ट्रॅकचे तिसरे वळण कायम ठेवण्यात आले आहे. त्याठिकाणी आता धातुच्या गार्डरेलआधी आणखी टायर्सचा अडथळा ठेवण्यात आला आहे. एफआयएने ग्रोजॉनला घडलेल्या अपघाताचा सखोल तपास सुरु केला आहे. सहा ते आठ आठवड्यात तो तपास पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER