थँक यू आकाशवाणी, नाही ऋणातच रहायला आवडेल…

Shailendra Paranjapeवर्ल्ड रेडिओ डे किंवा जागतिक रेडिओ दिन १३ डिसेंबर २०१२ पासून साजरा करण्यास सुरुवात झाली. युनेस्कोने ही सुरुवात केली आणि भारतातही जागतिक रेडिओ दिन साजरा होऊ लागला. युनायटेड नेशन्स रेडिओला सुरुवात झाली ती १३ फेब्रुवारी १९४६ ला. जागतिक रेडिओ दिन साजरा करण्याबद्दलची पार्श्वभूमी विकीपीडिया वरून आज कोणालाही उपलब्ध झालीय पण ऐंशी नव्वद वर्षांपूर्वी टीव्ही नव्हता, संगणक आजच्या प्रमाणात उपलब्ध नव्हते, ना गुगल होते ना मोबाईल. त्यामुळे घरबसल्या माहिती आणि मनोरंजनासाठी आकाशवाणी हे एकमेव श्राव्य माध्यम होते.

भारतात रेडिओ सुरू झाला तो मुख्यत्वे करून लोकरंजन आणि लोकशिक्षण यासाठी. मग त्यासाठी कलाकार किंवा रेडिओवर काही सादर करू शकणारे लोक शोधणे हेही ओघानेच आले. रेडिओवर का सादर व्हावं, याचा विचार करताना मग त्यात गाणं आलं, नाटुकलं आलं, कलावंत शोधून त्याला रेडिओ माध्यमाची जाण येणं, हे करण्यासाठी खास करून रेडिओवर नेमणुका झाल्या. वेळोवेळी केलेल्या अभ्यासानंतर हे लक्षात आलं की लोकांना सर्वाधिक आवडतं ते संगीत. मग संगीताचे कार्यक्रम विविध स्वरूपात आले. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार निमंत्रित केले जाऊ लागले.

दिलेल्या वेळात परिणामकारक गायन वादन उत्तमपणे सादर व्हावं, नाटुकलं किंवा नाटक किंवा ज्याला श्रुतिका म्हटलं जातं, त्यात केवळ श्राव्य माध्यम आहे, हे लक्षात घेऊन करावं लागतं. लिखित नाटकाची रंगावृत्ती करावी लागत असे तसंच श्राव्य माध्यमाची ताकद ओळखून ते करणाऱ्यात पुरुषोत्तम जोशी यांचा आवाज पुणे आकाशवाणीवरून घराघरात गेला. गदिमांच्या अजरामर गीतरामायणाच्या गीताच्या आधी त्या गीताची माहिती देणारा पुरुषोत्तम जोशींचा आवाज ते गीत आधी मनःचक्षुपुढे आणि कानांसाठी आधीच पायघड्या घालून ठेवत असे. मग सुधीर फडके यांच्या संगीतानं सजलेलं गीतरामायणातलं गाणं घराघरात रेडिओवरून जाई आणि मनामनात वर्षानुवर्षे साठवलं जाई.

सार्वजनिक गणेशोत्सवात गाणं रस्त्यावर आलं, रेडिओने ते घराघरात नेलं आणि ते लोकप्रिय करण्यात आकाशवाणीचा वाटा मोलाचा आहे. जुन्या नाट्यसंगीतापासून लोकसंगीत भावसंगीत चित्रपटसंगीत हे सारं घराघरात नेलं. संगीत नाटकांना उतरती कळा लागल्यानंतरही ती टिकून राहिलीत ती आकाशवाणीमुळे. रेडिओ प्रोग्राम्स किंवा प्रमोशनल कार्यक्रमातून चित्रपटांचं प्रमोशन हे आजच्या पिढीला कदाचित गमतीचंच वाटू शकतं. पण आमच्या लहानपणी म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी आम्ही रेडिओला कान लावून आगामी चित्रपटांचं रेडिओवरून केलं जाणारं प्रमोशन ऐकायचो, हे आठवते. गंमतही वाटते. चित्रपटांच्या रेडिओ प्रमोशनमधे अखिल भारतीय पातळीवरचे निवेदक अमीन सयानी यांचा आवाज मनामनात पोहोचलेला आहे तो बिनाका गीतमाला या कार्यक्रमातून.

रेडिओची आमची पहिली गाठ पडली ती लहानपणीच. त्या काळात आम्ही भल्या पहाटे उठवले जायचो ते शाळेत जाण्यासाठी. शाळा सुरू व्हायची ती चौथ्या वर्षी. त्याला बिगरी म्हटलं जायचं, पहिलीत जातानाची तयारी या बिगरीत व्हायची. भल्यापहाटे उठवलं गेलं की सनईचा आवाज, त्यानंतर ऐकू येणारं वंदे मातरम् आणि मग बातम्या. हे सारं ऐकत आमची पिढी मोठी झाली. घरातल्या सर्व कुटुंबघटकांसाठीचे कार्यक्रम रेडिओवरून सादर होत. त्यातून प्रत्येकाला काही ना काही मिळत असे.

रेडिओच्या पुणे केंद्राचं आणि विविध भारतीचं ऋण फेडणं केवळ अशक्य आहे. कोणतीही अतिशयोक्ती न करता रेडिओने आमची पिढी श्रीमंत समृद्ध केलीय, हे कबूल करावेच लागेल. रेडिओ ऐकताना इतर कामं करणं शक्य होतं. प्रवास करताना रेडिओ ऐकला तर आपण एकटे नाही तर कोणी तरी आपल्याबरोबर आहे आणि हे कोणी म्हणजे आपले कुटुंबघटक आहेत, ही भावनाही होते. हल्ली आलेले कारवासारखी प्रिरेकॉर्डेड पाच सहा हजार गाणी निरंतरपणे ऐकवणारी मशिन्सही आम्हाला पचनी पडत नाहीत कारण त्यात काही वेळा ऐकल्यानंतर गाणं प्रत्यक्ष सुरू होण्याआधी माहीत होतात. कुतुहल संपून जीते. पण रेडिओवरून कोणत्या गाण्यानंतर कोणते गाणे लागेल आणि कोणत्या मुलाखतीतून खजिना वाटावी, अशी कोणती माहिती मिळेल, यातली अनिश्चितता रेडिओला आजही जीवनातला अविभाज्य भाग करून गेली आहे.

कालानुरूप रेडिओदेखील आता मोबाईल अँप्लिकेशनवरून ऐकता येऊ लागलाय. काही लोक बदल करून घ्यायला राजी नसतात, ते नाकंही मुरडतील पण रेडिओवरील अनेक कार्यक्रमांमधून अगदी पंचाहत्तरी उलटलेल्या आजी मोबाईलवरून रेडिओ स्पष्ट ऐकता येतोय, अगदी परराज्यातून पुणे केंद्र ऐकता येतेय, हे सांगतात आणि तेही खरखर न होता ऐकता येतेय, हे सांगतात, तेव्हा भारी वाटतं. आपणही तेच ऐकतोय, याचा अभिमान वाटतो.

तंत्रज्ञानामुळे जग जवळ आणलंय, जवळची माणसं दूर जात चाललीत. अशा वेळी कोणताही निवृत्तीचा, नकारात्मक सूर न लावता एकटेपणालाही दूर घालवता येतं, ते रेडिओच्या सहवासाने. मोबाईल उचलावा, रेडिओ लावावा आणि अक्षय आनंदाचा ठेवा हवा तेव्हा मनात साठवून घ्यावा.

इतना तो करना स्वामी, जब प्राण तनसे निकले, हे भजन पुरुषोत्तमदास जलोटा आणि नंतर त्यांचे पुत्र अनुप जलोटा यांच्या आवाजात ऐकलेय, ते आकाशवाणीमुळेच. त्या भजनातल्यासारखीच ही पण एक इच्छा आहे की इतना तो करना स्वामी, जब प्राण तनसे निकले, आकाशवाणी सुनते सुनते प्राण तन से निकले… थँक यू आकाशवाणी असं म्हणून लाजवणार नाही, ऋणात राहयलाच आवडेल, आजन्म.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER