माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न २९ फेब्रुवारीपर्यंत सोडविणार- शेषराव बढे

निरंजन डावखरे यांना शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन

Sheshrao Badhe-Niranjan Davkhare

ठाणे/(प्रतिनिधी) :- ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर २९ फेब्रुवारीपर्यंत तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन आमदार निरंजन डावखरे यांना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शेषराव बढे यांनी दिले आहे. भाजपा शिक्षक आघाडीच्यावतीने गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या सहविचार सभेमध्ये जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांना रखडलेल्या प्रश्नांवर दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या सभेला शिक्षक आघाडीचे कोकण विभाग अध्यक्ष एन. एम. भामरे, शिक्षणाधिकारी शेषराव बढे, वेतन विभागाचे अधीक्षक श्री. विष्णू पाटील, उपशिक्षणाधिकारी ललिता दहितुले, शिक्षक आघाडीचे उपाध्यक्ष विकास पाटील, मो. ह. विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र राजपूत, विनोद शेलकर आदी उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : बारावीच्या परीक्षेचे पेपर तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार

विनाअनुदानित व अनुदानित तुकड्यांचे सर्व प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती करणे, अल्पसंख्यांक संस्थातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे, विनाअनुदानित अल्पसंख्यांक शाळांचे प्रस्ताव मार्चपर्यंत मंजूर करणे, महिलांना बालसंगोपनाची रजा मंजूर करण्याबाबत सर्व शिक्षण संस्थांना पत्र पाठविणे, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांना मंजुरी देणे, विविध शाळांमधील प्रलंबित वैयक्तिक मान्यतेच्या प्रस्तावांना मान्यता देणे आदी निर्णय सभेमध्ये घेण्यात आले. या निर्णयांची २९ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांनी दिले.

शिक्षणसेवक कालावधी पूर्ण केलेल्या तरुणांना सेवासातत्य, निवडश्रेणीस पात्र ठरलेल्या शिक्षकांची यादी जाहीर करुन लेखाधिकाऱ्यांकडे पाठविणे, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांना लवकरात लवकर मान्यता आदी निर्णयही सभेत घेण्यात आले.