ठाणे सत्र न्यायालयाचा राज्य सरकार आणि एटीएसला दणका, दिला आदेश …

NIA - mansukh hiren - court order - Maharastra Today
  • मनसुख हिरेन हत्याप्रकरणाचा तपास थांबवा, कागदपत्रे एनआयएला द्या ! ठाणे सत्र न्यायालय

मुंबई : एटीएसने मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास थांबवून हे प्रकरण एनआयएकडे हस्तांतरित करावे, असा आदेश ठाण्यातील सत्र न्यायालयाने दिला.या तपासावरून एनआयए विरुद्ध एटीएस असा सामना सुरू झाल्याचे दिसते. या प्रकरणाचा तपास हाती घेण्याचे निर्देश एनआयएने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आणल्यानंतरही एटीएसने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला नव्हता. उलट, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशांनंतर एटीएसने या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून मंगळवारी या प्रकरणावर पत्रकार परिषद देखील घेतली होती.

तपास तातडीने होणार हस्तांतरित

केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश देऊन देखील महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हस्तांतरित करत नसल्याची तक्रार एनआयएने ठाणे सत्र न्यायालयात केली होती. एनआयएची ही तक्रार मान्य करत सत्र न्यायालयाने एटीएसला उल्लेखित आदेश दिले आहेत. एटीएसने आत्तापर्यंत केलेल्या तपासाची कागदपत्रे, पुरावे आणि त्यासोबतच अटक केलेले दोन आरोपी (निलंबित पोलीस हवालदार विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोर) या दोघांना देखील एनआयएच्या ताब्यात देण्यात यावे, असे देखील न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

नुकतीच केली होती दोन आरोपींना अटक

या प्रकरणातील महत्त्वाची कडी ठरलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने याआधीच अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणात अटक केली आहे. आता मनसुख हिरेन प्रकरण देखील एनआयएकडे आल्यामुळे या दोन्ही प्रकरणांवर सचिन वाझेंची चौकशी करण्याचा मार्ग एनआयएसाठी मोकळा झाला आहे. मंगळवारी एटीएसने पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेंनीच विनायक शिंदे या पॅरोलवरील आरोपीचा वापर करून गुन्ह्यामध्ये सहभाग ठेवल्याचे स्पष्ट केले होते. वाझेंच्या सांगण्यावरूनच विनायक शिंदेने गुन्ह्यात वापरलेले सीमकार्ड खरेदी करून इतरांना दिले होते. या प्रकरणात अजून काहींना  अटक होण्याची शक्यता आहे, असे एटीएसने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER