ठाण्यात पुन्हा लॉकडाऊन; २ ते १२ जुलैपर्यत कडकडीत बंद

ठाणे : करोना रुग्णांचा वाढती संख्या रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेनं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. २ ते १२ जुलैपर्यत ठाण्यात सगळे नियम आणि निर्बंध पुन्हा लागू केले जाणार आहेत. ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाणे पोलिस संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

२ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते १२ जुलैच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील कटेन्मेंट झोनमध्ये अधिक प्रभावीपणे लॉकडाऊनचे नियम कठोर केले आहेत. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यवहारांवर निर्बंध जारी करण्यात आले आहेत. या कालावधीत शहरातील अंतर्गत रस्ते बंद राहणार असून, प्रत्येक महत्वाच्या स्पॉटवर पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. याशिवाय शहरातील किराणा मालाची दुकाने, इतर साहित्याची दुकाने, भाजी मार्केट हे सर्व देखील या कालावधीत बंद राहणार आहेत. मॉर्निग वॉक आणि इव्हनींग वॉक हे देखील बंद असणार आहेत. शिवाय कोणालाही विनाकारण घरा बाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तुच्या ने आण करण्याशिवाय इतर सर्व कारणांकरीता ठाणो महापालिका हददीत लॉकडाऊन असणार आहे. इंटरसिटी, एसएसआयटीसी बसेस आणि मेट्रोसह सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी असणार नाही, टॅक्सी, ऑटो हे सुध्दा बंद असणार आहे. सरकारी कार्यालयात वावरताना कर्मचाऱ्यांमध्ये कमीत कमी ३ फूट अंतर राखणं आवश्यक आहे.

कळवा, मुंब्रा ही आधी अधिक प्रादुर्भावाची क्षेत्रे होती, त्यानंतर आता लोकमान्य नगर, सावरकर नगर, मानपाडा, माजीवडा हे हॉटस्पॉट ठरले आहेत. माजीवडा-मानपाडा भागात दहा दिवसांत अडीचशे नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या दोन-चार दिवसांत कल्याण-डोंबिवलीत तीनशेच्या घरात नव्या रुग्णांची भर पडली आहे. या आधी भिवंडी, अंबरनाथमध्ये पालिकेनं लॉकडाऊन जाहीर केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER