कोरोनाच्या लढाईत ‘ठाकरे’ सरकार अपयशी ठरले; लष्कराला बोलवण्याची गरज – नारायण राणे

narayan rane uddhav thackeray

मुंबई :- इतर राज्यांच्या तुलनेत आज महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांवर गेली आहे.  याच मुद्द्यावरून भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. “कोरोनाचा आकडा तीन हजारांवर गेला आहे, रुग्णवाढ आणि मृत्यूला हे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. महाराष्ट्रात तीन पक्षांचं हे सरकार आहे, या सरकारचं कौतुक कशाबद्दल करायचं? बाकीच्या राज्यातील आकडे बघा आणि महाराष्ट्रातील कोरोनाचे आकडे बघा. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना विनंती करतो की, महाराष्ट्रात तातडीने लष्कर पाचारण करा.” असं नारायण राणे यांनी नमूद केलं. ते टीव्ही-९  मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

महाराष्ट्रातील मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने याची चीड येते.  अन्य राज्यांनी कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवलं, मग प्रगत महाराष्ट्राला का जमत नाही? हे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. महाराष्ट्रात लष्कराला पाचारण करणं, होमगार्डला मदतीला घेणं आवश्यक आहे.  ज्या ठिकाणी रुग्ण नाहीत तिथे उद्योगधंदे सुरू करावेत, अर्थव्यवस्थेवर लक्ष द्यावं, कोरोनावर कशी मात करावी यासाठी विचारवंतांची मदत घ्यावी. धारावीसारख्या ठिकाणी ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या त्या महाराष्ट्र सरकारने केल्या नाहीत.  केरळ, राजस्थानमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात झालं नाही, तशी खबरदारी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये घेतली नाही, असं नारायण राणे म्हणाले.

मजुरांची गर्दी का होते? वांद्र्यात जमावबंदी नाही का? पोलिसांनी गर्दी जमू कशी दिली? सरकारचं हे अपयश आहे.  सरकारमध्ये ताळमेळ नाही, सोशल मीडियावर सरकारचं कौतुक करायला लावलं जात आहे. मजूर गावी का जात आहेत? त्यांना अन्न-पाणी दिलं जात नाही.  हाताला काम नाही, त्यांची उपासमार होतेय म्हणून ते गावी चाललेत. महाराष्ट्रात त्यांची उपासमार होतेय.  बांद्र्यात जिथे हे लोक जमले तिथून मुख्यमंत्री पाच मिनिटांच्या  अंतरावर राहतात. वांद्र्यात जमावबंदी नाही का? हे सरकारचं अपयश आहे, महाराष्ट्रातील उद्योगांची अवस्था काय आहे? महाराष्ट्र हे प्रगत राष्ट्र होतं त्याला अधोगतीकडे नेण्यासाठी हे कोरोनाचं संकट आणि त्याला रोखण्यात अपयशी ठरलेलं हे महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, असाही आरोप नारायण राणे यांनी केला.

सरकारने काही उपाययोजना केल्या नाहीत, फक्त घोषणा केल्या. त्याची अंमलबजावणी होत नाही, लोकांपर्यंत काही पोहचत नाही, सर्व्हे करून माहिती गोळा करा.  रुग्णालयांची तर अवस्था वाईट आहे, असा दावा राणेंनी केला.

नाचता येईना अंगण वाकडं, असं आदित्य ठाकरेंचं झालंय.  यांना काही करता येईना आणि हे केंद्रावर ढकलत आहेत.  केंद्राकडे एका बाजूला मदत मागतात आणि दुसऱ्या बाजूला टीका करतात.  केंद्रावर टीका करण्याइतकं यांचं मोठं पद नाही, असा हल्ला  राणेंनी आदित्य ठाकरेंवर चढवला. महाराष्ट्रातील जनतेला विनंती, पंतप्रधान मोदींनी आवाहन केलंय लॉकडाऊन पाळा. त्याला साथ द्या, घरीच राहा.  कोरोनावर मात करण्यासाठी सहकार्य करा.  महाराष्ट्रातील जनता राष्ट्रीय संकटावेळी एकजूट दाखवते, यावेळीही दाखवा, असं आवाहन राणेंनी केलं.