मोदींशी वन टू वन चर्चेद्वारे ठाकरेंचा सहकाऱ्यांवर दबाव!

Maharashtara Today

मुंबई:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नवी दिल्लीत स्वतंत्रपणे पाऊण तास चर्चा केल्यानंतर राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले असतानाच या भेटीच्या निमित्ताने ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन मित्रपक्षांवर एकप्रकारे दबाव वाढविला असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) यांनी गेल्या आठवड्यात आणि सोमवारी मुख्यमंत्री ठाकरे(CM Thackeray) यांची भेट घेतली होती आणि सरकार चालविताना राष्ट्रवादीच्या काही अटी त्यांच्यासमोर ठेवल्या होत्या. काही मुद्यांवर राष्ट्रवादीची भूमिका सरकारला मान्य करावी लागेल, असा आग्रह धरला होता अशी माहिती आहे. दलित, आदिवासींचा अजेंडा हे सरकार राबविणार नसेल तर आम्हाला सरकारमध्ये राहण्यात स्वारस्य नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अलीकडेच म्हटले होते. पदोन्नतीतील आरक्षणावरून प्रसंगी काँग्रेस सत्तेतून बाहेर पडेल, असा इशारा ऊर्जामंत्री व काँग्रेसचे नेते नितीन राऊत (Nitin raut) यांनी दिला होता. वित्त विभाग उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे आहे आणि शिवसेना व काँग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यांना निधी दिला जात नसल्याची ओरड आहे.

आपल्या मर्जीचे निर्णय करवून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे मंत्री हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर सातत्याने दबाव आणतात असे म्हटले जाते. काँग्रेस व राष्ट्रवादीचे दबावतंत्र त्यांच्यावरच उलटविण्याच्या खेळीचा एक भाग म्हणून पंतप्रधानांची स्वतंत्र भेट मिळेल, असे प्रयत्न ठाकरे यांनी कसोशीने केले आणि स्वतंत्र भेट मिळवून घेतली. ‘सध्याचे मित्रपक्ष माझ्यावर दबाव आणणार असतील तर जुने मित्र आहेतच’ असा सूचक इशारा ठाकरे यांनी आजच्या भेटीने मित्रपक्षांना दिला असे म्हटले जाते. ‘आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नसू; पण याचा अर्थ आमचे नाते संपले आहे असा होता नाही.’ असे विधान मोदींना भेटल्यानंतर माध्यमांशी बोलताना करून ठाकरे यांनी मित्रपक्षांना घाबरविले. युतीची कवाडे पूर्णत: बंद केलेली नाहीत असा संकेत दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शिवसेनेच्या नेहमीच टार्गेटवर राहिले आहेत.

शिवसेनेच्या मुखपत्रातून या दोन्ही नेत्यांवर टोकाची टीका होत असते. या कटुतेमुळेच कोरोनाच्या काळात अपेक्षित असलेले सहकार्य राज्याला केंद्राकडून मिळालेले नाही असे मानले जाते. राज्य शासनाची आर्थिक स्थिती बिकट असतानाच्या परिस्थितीत केंद्राने भरीव मदतीचा हात दिला नाही तर महाराष्ट्र अधिकच संकटात सापडणार आहे. हे लक्षात घेऊन मोदींशी असलेले संबंध सुधारण्याचा ठाकरे यांनी या निमित्ताने प्रयत्न केला. ठाकरे आणि मोदी यांच्यात राजकीय चर्चा निश्चितपणे झालीच असणार. ती चर्चा नेमकी काय झाली  हे राज्यात नजीकच्या काळात होणाऱ्या  राजकीय घडामोडींवरून लक्षात येईलच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button