मराठी भाषिकांच्या लढ्याला ठाकरे सरकारचा पाठींबा ; 1नोव्हेंबरला काळ्या फिती लावून कामकाजाचा निर्णय

CM Uddhav Thackeray

मुंबई :  गेली ६५ वर्षे सीमा भागातील मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी सीमा भागात काळा दिवस पाळण्यात येतो. यंदा ठाकरे सरकारनेही (Thackeray Govt) या लढ्याला साथ दिली आहे. मराठी भाषिक बांधवांवर कर्नाटक राज्य सरकारकडून होणाऱ्या दडपशाहीचा निषेध नोंदवण्यासाठी मराठी भाषिक (Marathi speakers) बांधवांच्या लढ्याला पाठिंबा जाहीर करून त्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रराज्यसरकार मधील सर्व कॅबिनेट तसेच राज्य मंत्री काळी फित परिधान करून काम करतील असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाबद्दल माहिती दिली. १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती. तेव्हापासून सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय केला जात आहे. सीमाभागात असणारी मराठी भाषिक गावे अनेक मार्गांनी महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र, कर्नाटक सरकार त्यांची आंदोलने आणि प्रयत्न अन्यायाने दडपून टाकते. ही गावे महाराष्ट्रात येण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरु आहे. महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठिशी उभे आहे. यंदा आम्ही सीमाभागातील या मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी मंत्रिमंडळासमोर एक प्रस्ताव ठेवला होता. छगन भुजबळ यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. यानंतर सर्व मंत्र्यांनी हा प्रस्ताव एकमताने मंजूर केला. त्यानुसार 1 नोव्हेंबरला आम्ही मंत्री काळ्या फिती लावून मराठी भाषिकांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून सीमाभागातील मराठी गावांचा महाराष्ट्रात समावेश करण्याचा मुद्दा खितपत पडला आहे. दोन्ही राज्यांमध्ये वेगवेगळी सरकारं येऊनही अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. शिवसेनेकडून अधूनमधून सीमाभागातील मराठी भाषिकांचा मुद्दा उपस्थित केला जातो. मात्र, त्यापलीकडे ठोस असे काही घडताना दिसत नाही. या भागात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून वेळोवेळी सीमावासियांच्या महाराष्ट्रातील समावेशाचा मुद्दा उचलून धरला जातो. मात्र, आजपर्यंत कर्नाटक सरकारने या ना त्या मार्गाने मराठी भाषिकांवर निर्बंध घालण्यात धन्यता मानली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER