ठाकरे सरकारचे पवारांना बर्थडे गिफ्ट ; शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत शेतकरी होणार लखपती!

NCP - Sharad Pawar

मुंबई :- महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) शिल्पकार शरद पवार (Sharad Pawar) यांना ठाकरे सरकारने (Thackeray Government) बर्थडे गिफ्ट दिलं आहे. राज्यात शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्याचा निर्णय झाला असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला लखपती करण्याचे ध्येय आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना’ राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

कामांतून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबविण्यात येणार आहे.

‘मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत राबविण्यात येतील. त्यामध्ये प्रत्येक लाभार्थीला गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग या चार वैयक्तिक कामांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्याला वैयक्तिक व सार्वजनिक कामे हाती घेऊन त्याद्वारे कायमस्वरूपी मत्ता निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व कामाअभावी होणारे स्थलांतर थांबविणे हा उद्देश आहे. या कामांसाठी आवश्यक असणारे ६०:४० अकुशल-कुशल कामगारांचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विविध योजनांच्या जसे की, शेततळे, वृक्ष लागवड, शोषखड्डे, फळबाग लागवड, इत्यादी अकुशल खर्चाचे प्रमाण जास्त असलेल्या योजनांच्या संयोजनातून या बाबी दिल्याने प्रत्येक शेतकरी समृद्ध (लखपती) होईल, असा योजनेचा उद्देश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER