ठाकरे सरकारची घोषणा मात्र, मराठा आरक्षणाच्या बैठकीचे अद्याप निमंत्रण नाही – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray

मुंबई : फडणवीस सरकारच्या काळात मागील वर्षी मराठा आरक्षण एकमताने विधानसभेत पास झाले होते. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) हे आरक्षण टिकवणे, ते लागू करून घेणे हे विद्यमान सरकारसाठी आव्हान होते. मात्र, सर्वोच्च न्यालयापर्यंत गेलेले मराठा आरक्षणाला यावेळीही स्थगिती मिळाली. व हे आरक्षण खंडपीठाकडे आले.

यामुळे मराठा बांधवांची पुन्हा घोर निराशा झाली आहे. यावर राज्यसरकारने मराठा बांधवांना धीर दिला आणि आरक्षण मिळवून देण्यासाठी पुन्हा सुप्रिम कोर्टात आरक्षणाची लढाई लढू असे सांगितले. यासाठी काय रणनिती करता येईल यासाठी ठाकरे सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

परंतु, या बैठकीचे अद्याप आपल्याला निमंत्रणच मिळाले नाही, असा दावा भाजपचे (BJP) विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. तसंच जर निमंत्रण दिलेच नाहीतर बैठक रद्द होण्याचा विषयच नाही, असंही फडणवीस म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. परंतु, सरकारच्या घोषणेनंतर 36 तास उलटून गेल्यावरही मराठा आरक्षण प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्याशी सरकारचा कोणताही संपर्क नाही, अशी माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरू आहे. ज्या मराठा संघटना आहे, जी लोकं आहे त्यांच्याशी बोलत आहे. अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांशी बोलणे सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणं झालं आहे. मराठा आरक्षणासाठी आम्ही सरकारसोबत आहोत अशी ग्वाही फडणवीसांनी दिली’ अशी माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली होती.

मात्र, ‘मराठा आरक्षण प्रकरणी सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांना बैठकीचं अजूनही कोणतंही निमंत्रण दिलेलं नाही. सरकारच्या एकाही मंत्र्याचा फडणवीस यांच्याशी बैठकीबद्दल अजूनही संपर्क केला नाही. त्यामुळे विरोधकांना मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी चर्चेचं निमंत्रण म्हणजे बोलाचीच कढी बोलाचाच भात?’ असं म्हणत फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन मग मराठा आरक्षणासंदर्भात सरकार निर्णय घेणार असल्याची घोषणा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली होती.

दरम्यान, बिहार दौऱ्यावर असलेले देवेंद्र फडणवीस आज दुपारी मुंबईत पोहचणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER