येत्या मे-जूनमध्ये महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार; भाजप नेत्याचा दावा

नागपूर : कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर महाराष्ट्रात भाजपचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. ‘राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार येत्या मे-जून महिन्यापर्यंत कोसळेल’, असा दावा भाजपचे प्रवक्ते आणि विधानपरिषदेतील आमदार गिरीश व्यास यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक; शिवसेनेच्या भूमिकेवर काँग्रेस नाराज?

यावेळी ते म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार येत्या मे-जून महिन्यापर्यंत कोसळणार असल्याने भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. कर्नाटक निकालानंतर राज्यातील भाजपच्या गटात हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर निवडणुकीत संपूर्ण बहुमत मिळेल असा आम्हाला विश्वास आहे, असं गिरीश व्यास यांनी सांगितलं.

कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला. १५ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने तब्बल १२ जागा काबीज केल्या. दोन जागा काँग्रेसने तर एक जागा अपक्षने जिंकली. भाजपला कर्नाटकात सत्ता टिकवण्यासाठी १५ पैकी किमान ६ जागांवर विजय मिळवणं आवश्यक होतं. मात्र मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्त्वातील भाजपने तब्बल १२ जागांवर विजय प्राप्त केला.

दरम्यान, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार दोन महिन्यात कोसळेल आणि भाजप पुन्हा बहुमताने सत्तेत येईल, असा दावा भाजपने यापूर्वीच व्यक्त केला आहे.