खासगी रुग्णालयांकडून होणारी लूटमार रोखण्यात सरकार सपशेल अपयशी – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis - CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Coronavirus) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयात करोना रुग्णांकडून वाट्टेल तशी बिलांची आकारणी होत असून खुलेआम सुरू असलेली ही लूटमार रोखण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे . तसेच रुग्णांची लूटमार रोखण्यासाठी आरोग्य विभागाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली . एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते .

केवळ सर्वसामान्य कोरोना रुग्ण खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा होणाऱ्या लूटमारीवर बोलत नाही तर सत्ताधारी शिवसेनेचे अनेक पदाधिकारीही याबाबत बोलत आहेत.

गेल्या पाच महिन्यांपासून खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांकडून लाखांनी उपचाराची बिले वसूल केली जात आहेत. काही रुग्णालयांत तर दिवसाचे उपचाराचे बिल ५० हजार ते एक लाख रुपये आकारण्यात येत आहे. प्रामुख्याने मुंबई व ठाणे जिल्ह्यांतील खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या रुग्णांकडून उपचारासाठी किती रक्कम आकारावी याचे ताळतंत्र सोडल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सरकारने ३० एप्रिल रोजी व २१ मे रोजी दोन आदेश जारी केले होते. त्यानुसार कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड राखून ठेवण्याचा आदेश ३० एप्रिल रोजी जारी झाला तर २१ मे रोजी खासगी रुग्णालयातील लूटमार रोखण्यासाठी नेमके किती दर रुग्णालयांनी आकारावे त्याचा आदेश जारी करण्यात आला. आजपर्यंत राज्यातील किती खासगी रुग्णालयांतील ८० टक्के बेड सरकारने कधीपासून राखून ठेवले व रुग्णांची लूटमार रोखण्यासाठी काढलेल्या आदेशानुसार किती रुग्णालयांवर कारवाई केली ते सरकारने हिंमत असेल तर जाहीर करावे, असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. प्रामुख्याने मुंबई व ठाण्यासह संपूर्ण एमएमआर विभागात कोरोना रुग्णांची वारेमाप लूटमार आजही सुरू आहे. सरकार केवळ कागदी घोडे नाचवत असून कोरोनावरील उपचारात कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER