रुग्णांची लुटमार थांबवण्यासाठी ठाकरे सरकारने खासगी रुग्णालये घेतली ताब्यात; फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे काही कोरोना बाधित खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. परंतू खासगी डॉक्टर रुग्णांकडून लाखोंचे बील काढत आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रुग्णांची लुटमार थांबवण्यासाठी ठाकरे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारकडे हा ताबा असणार आहे. याशिवाय राज्य सरकारने उपचार खर्चाची मर्यादाही ठरवून दिली आहे.

रात्री उशिरा हा आदेश जारी करण्यात आला. यानुसार खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटांचा ताबा तसंच रुग्णाला किती बिल आकारलं जाणार हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असणार आहे. तर २० टक्के खाटांसाठी दर आकारण्याचा अधिकार रुग्णालयांकडे राहणार आहे.

ठाकरे सरकारच्या आदेशानुसार विलगीकरण बेडसाठी चार हजार रुपये, व्हेंटिलेटरशिवाय असणाऱ्या आयसीयू बेडसाठी ७५०० तर व्हेंटिलटर सपोर्ट असणाऱ्या आयसीयू बेडसाठी ९००० रुपये आकारले जाणार आहेत.

याशिवाय इतर २७० प्रक्रिया आणि शस्त्रक्रियांसाठीचे दरही ठरवले आहेत. यामध्ये कॅन्सर उपचाराचा समावेश आहे. यामध्ये डॉक्टरांच्या फीचाही समावेश असणार आहे. हॉस्पिटलची तयारी असेल तर ते अतिरिक्त रक्कम डॉक्टरांना देऊ शकतील.

धर्मदाय विश्वस्तांकडून चालवल्या जाणाऱ्या सर्व रुग्णालयांचा या निर्णयात समावेश असणार आहे.

प्रसूतीसाठीचे रुग्णालयं ७५ हजारापेक्षा जास्त बिल आकारु शकत नाही. गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी १ लाख ६० हजार रुपये तर अँजिओग्राफीसाठी रुग्णालय १२ हजारापेक्षा जास्त बिल आकारु शकत नाही. अँजिओप्लास्टी करण्यासाठी १.२ लाखांपेक्षा जास्त बिल आकारलं जाऊ शकत नाही असं आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान रुग्णांवर उपचार करताना दर्जा काय राखला जावा असंही आदेशात सांगण्यात आलं आहे. राज्यात सध्या करोनाचे ४१ हजाराहून अधिक करोना रुग्ण असून एकट्या मुंबईत २५ हजार रुग्ण आहेत.

खासगी रुग्णालयाकडून होणारी लुटमार थांबवावी असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या लुटमारीविरोधात आवाज उठवला. भाजपा नेते किरिट सोमय्या यांनीही काही रुग्णालयातील प्रकरणे बाहेर काढली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER