उद्धव सरकार पडता पडता वाचले

badgeमहाविकास आघाडीचे तीन पायांचे सरकार किती क्षणभंगुर आहे याचा प्रत्यय आज आला. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी, कुणीही हे सरकार एका चुटकीत पाडू शकते. सरकार पडायला काही मोठे कारण लागेल असेही नाही. सोनिया गांधींना नमस्कार केला नाही म्हणूनही काँग्रेसवाले सरकार पाडू शकतात आणि पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणूनही हे सरकार कोसळू शकते. आज हे सरकार पडता पडता वाचले. नागपूर अधिवेशनाला सामोरे जाण्याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी गेले असते. पण स्वतःला राष्ट्रहिताचे प्रहरी म्हणवणारे उद्धव ठाकरे एका रात्रीत बदलले आणि सरकार वाचले.

वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला लोकसभेत पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेला काही तासांतच आपली भूमिका बदलावी लागली. उद्या हे विधेयक राज्यसभेत येईल तेव्हा शिवसेनेची घाबरगुंडी दिसणार आहे. ‘लोकसभेत काय घडले ते विसरून जा’ असे सांगून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्याच्या वादळाची कल्पना दिली.

उद्धव वाटणार तात्पुरती खाती

लोकसभेत रात्री उशिरा हे विधेयक मंजूर झाले तेव्हा शिवसेनेने ह्या विधेयकाला पाठिंबा दिला ही गोष्ट काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना आवडली नाही. सोनियांनी डोळे वटारताच खळबळ उडाली. उद्धव ठाकरे यांनी भूमिका बदलून सरकार वाचवले. शिवसेनेला लगेच आपली बदललेली भूमिका सांगावी लागली. पण हे करताना शिवसेनेला पुन्हा एकदा हिंदुत्वाचा बळी द्यावा लागला. उद्धव यांच्यावर अशी वेळ वारंवार येणार आहे. कधी सोनिया तर कधी शरद पवार यांच्या इशाऱ्यावर उद्धव सरकारला काम करावे लागणार आहे.

नागपूर अधिवेशन अवघ्या सहा दिवसांवर आले असताना सहा मंत्र्यांचे खातेवाटप उद्धव करू शकत नाहीत ह्यावरून हे सरकार किती लोक चालवत आहेत याचा अंदाज येतो. उद्धव मुख्यमंत्री असले तरी त्यांच्या हाती काही नाही. रिमोट एकाकडे नव्हे तर दोघांकडे आहे. स्वयंपाकी अनेक असले तर जेवण बिघडते. तसे ह्या सरकारचे सुरू आहे. खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार रखडला. हे सरकार फार दिवसांचे पाहुणे नाही. अंतर्विरोधातून स्वतःहून ते कोसळेल.