‘ठाकरे’ सरकार खुळ सरकार नाही’, संभाजी राजे संतापले

Sambhaji Raje Chhatrapati - CM Uddhav Thackeray

मुंबई :- आता गरीब मराठा समाजाला योग्य न्याय देण्याची घटका जवळ आली आहे. इतर बहुजन समाजाताली लोकांना जो न्याय मिळतो तोच मराठा समाजातील लोकांना मिळावा अशी आमची मागणी आहे. मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय सरकारी दरबारी पोहोचवायचा असेल तर रस्त्यावर आंदोलन करावं लागतं. ५८ मोर्चे काढून हा विषय पोहचवला आहे, सरकारला सर्व गोष्टी माहिती आहे. हे ‘ठाकरे’ काही खुळं सरकार नाही ना, म्हणूनच ते सरकार अस्तित्वात आले आहे, अशी संतापजनक प्रतिक्रिया खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि राजर्षी शाहू महाराजांनी जी रचना रचली आहे ती आता महाराष्ट्राला लागू होत नाही का? अशी विचारणाही यावेळी संभाजीराजेंनी राजकीय नेत्यांना केली. ते औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

संभाजी राजे पुढे म्हणाले. जे राज्याच्या हातात आहे ते राज्याने आणि केंद्राच्या हातात जे आहे ते त्यांनी करावे. पण मराठा आरक्षण प्रश्न तात्काळ सोडवावा. या विषयावर मी कोणत्याही राजकीय नेत्यांना भेटण्याचं टाळलं आहे. समाजाची अस्वस्थता जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे २७ ऐवजी आपण २८ तारखेला भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

मराठा आरक्षणाबाबत सरकारला सर्व गोष्टी माहिती आहे. हे काही खुळं सरकार नाही, म्हणूनच ते सरकार अस्तित्वात आले आहे. पुन्हा एकदा लोकांना वेठीस धरणं या विचाराचा मी नाही. मी शिव शाहूंचा वंशज असून सामान्यांची काळजी करणं माझं कर्तव्य आहे. कोरोना संकट असल्याने लोकांचा जीव धोक्यात घालू शकत नाही. आंदोलन करावं की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. सरकार कोणतीही दखल घेत नसेल तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करावंच लागेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.

सरकारच्या हातात अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम आपली जबाबदारी माझ्यासकट खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांची आहे. त्यामुळे समाजाला वेठीस धरु नका. इतर बहुजन समाजातील लोकांना कसा न्याय देत आहात? माझ्यासहित जो श्रीमंत वर्ग आहे त्यांना एक टक्काही मदत देऊ नका. पण जो ३० टक्के गरीब समाज आहे त्यासाठी अपवादात्मक मदत कशी करणार ते सांगा, असा संतप्त सवालही यांनी उपस्थित केला. मराठा आंदोलनाला भाजपाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, मी काही कोणाला सल्ला देणार नाही. मी समाजाचा घटक असून समाजाची बाजू मांडत असतो. ते काय मांडतात तो त्यांचा अधिकार आहे. त्यांची भूमिका त्यांना विचारा. समाजाची बाजू प्रामाणिकपणे सरकार दरबारी मांडणे ही माझी भूमिका आहे. २००७ पासून मी हे करत असून त्यासाठी मला कोणी आव्हान देऊ शकत नाही, असेही संभाजी राजे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : ठाकरे सरकारची सर्कस सुरूच, तर जनतेची ससेहोलपट; भाजपचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button