‘कुमारस्वामी’ होण्याच्या भीतीने ठाकरेंनी मंत्रिमंडळ विस्तार लांबवला

मुंबई : मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांना भाजप कर्नाटकचा प्रयोग करून फोडेल आणि सरकार पाडेल या भीतीने धास्तावलेल्या शिवसेनेने मंत्रिमंडळाच्या विस्तार लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे. नवे सरकार येऊन १५ दिवस होत आले तरी मंत्रिमंडळात फक्त सातच मंत्री आहेत. त्यांच्याकडे सर्व खाती तात्पुरती वाटून देण्यात आली आहेत.

मविआच्या या सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तीन पक्ष आहेत. मंत्रिमंडळाचा आताच विस्तार केला तर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने काही नाराज आमदार भारतीय जनता पार्टीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. असे झाले तर महाराष्ट्रात आपला कुमारस्वामी होऊ शकतो अशी भीती उद्धव ठाकरेंना आहे. कर्नाटकात नाराज आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्याने जद (एस) – काँग्रेस आघाडीचे सरकार कोसळून येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला.

१५ दिवस उलटून गेल्यानंतर सगळेच मंत्री बिनखात्याचे असल्याची टीका होऊ लागली. खातेवाटप करण्यात आलं. सात मंत्र्यांवर तब्बल ५६ खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडे गृह आणि नगरविकास, राष्ट्रवादीकडे अर्थसहित गृहनिर्माण आणि ग्रामविकास, तर काँग्रेसकडे महसूलसह अन्य महत्त्वाची खाती देण्यात आली आहे. हे खातेवाटप तात्पुरते असल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनानंतर ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.