काबूल : गुरुद्वारावर अतिरेक्यांचा हल्ला, २७ भक्त ठार

Kabul Terrorist Attack

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका गुरुद्वाऱ्यावर बुधवारी बंदूकधारी आत्मघाती अतिरेक्यांनी हल्ला केला. यात एका मुलासह २७ शिखांचा मृत्यू झाला आहे. आठ जण जखमी आहेत. ११ मुलांसह ८० जणांना वाचवण्यात सुरक्षा दलांना यश आले.

चार बंदूकधारी अतिरेक्यांनी धर्मशाला गुरुद्वाऱ्यात सकाळी ७.४५ वाजता हल्ला केला. हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी गुरुद्वाऱ्याला वेढा घातला व तेथील भक्तांना बाहेर काढले. सहा तासांच्या धुमश्चक्रीनंतर सुरक्षा दलांनी चारही आत्मघाती अतिरेक्यांना ठार मारले.

अफगाणिस्तानचे शीख खासदार नारर्देंडरसिंह खालिसा यांनी हल्ल्यानंतर घटनास्थळाला भेट दिली. ते म्हणाले की, हल्ल्याच्या वेळी गुरुद्वाऱ्यात १५० पेक्षा जास्त भक्त होते. हा हल्ला पाकिस्तान समर्थित हक्कानी नेटवर्कने केला, असा आरोप अशरफ गनी सरकारने केला आहे. तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने या हल्ल्यामागे आमच्या संघटनेचा हात नाही, असा खुलासा केला आहे. दरम्यान, इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे असे कळते.