‘सीरम इन्स्टिट्यूट’ला भीषण आग

serum institute pune

पुणे : कोरोना प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ लसीमुळे सध्या जगात चर्चेत असलेल्या पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट’मध्ये भीषण आग लागली. आग दुपारी २ वाजता लागली असे कळते. इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली असून चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली आहे. अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी पोहचले आहेत.

सुदैवाने ‘कोविशिल्ड’ लसीची निर्मिती होत असलेले ठिकाण सुरक्षित असल्याचे सीरमकडून सांगण्यात आले आहे. मांजरी येथील या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतली जाणारी ‘बीसीजी लस’ तयार केली जाते. त्या विभागाला ही आग लागली, असे सांगितले जाते आहे. कोरोनावरील ‘कोविशिल्ड’ लस तयार केली जाते तेथून हा भाग काही अंतरावर आहे. सुदैवाने तिथपर्यंत आगीची झळ पोहचली नाही. आगीचे कारण अद्याप कळले नाही.

घटनास्थळी लोकांनी गर्दी केली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, “इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीला आग लागली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि प्रमुख अधिकारी घटनास्थळी पोहचलीत.” अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवत असून इमारतीत कोणते कर्मचारी अडकले आहेत का याची पाहणी करत आहेत. स्थानिक आमदार चेतन तुपे यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, “सीरमची मांजरीत जी नवी इमारत उभारण्यात आली आहे त्याच्या एका बाजूला आग लागली आहे.

कोरोनाची लस तयार करणाऱ्या युनिटला धोका नाही. आकाशवाणी परिसरातील जुन्या ठिकाणी लसीचे सर्व काम चालते. जीवितहानी झालेली कोणतीही माहिती नाही. अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पाच मजल्यांची इमारत असून तीन माळ्यांवर आग पसरली आहे. खूप जास्त धूर आहे. चार लोक अडकल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. तिघांना बाहेर काढले. अजून शोध सुरू आहे. १० गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. इमारतीत काय मटेरिअल आहे याची माहिती मिळवत आहोत.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER