कोविडपेक्षा भयंकर बाईट, ट्विट आणि व्हाट्स अप

Tweet-Whatsapp

करोनासंदर्भात अमेरिकेने भारताला मदत करणार नाही असे सांगितले की पंतप्रधान मोदींवर (PM Modi) व्हाट्स अपवरून टीका करायची आणि नंतर अमेरिकेने मदत करू, हे जाहीर केल्यानंतर आपलं चुकलं, असं कबूल करायचं नाही, याला कोतेपणा असंच म्हणावे लागेल. करोना असो की अन्य कोणताही निर्णय, उठसूट टीकाटिप्पणी करण्यापेक्षा आपण परिस्थितीमधे, वातावरणात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काय योगदान देऊ शकतो, हा विचार केला जायला हवा.

आपल्याकडे सार्वजनिक जीवनात राजकारण इतक्या प्रमाणात भिनलंय की आपल्याला मुळात कोणत्याही गोष्टीचा अराजकीय पदधतीने किंवा शुद्ध तार्किक पद्धतीने विचार करायची सवयच राहिलेली नाही. त्यामुळे मग निर्णय काय आहे, विधान काय आहे, यापेक्षा तो निर्णय कोणी घेतलाय किंवा विधान कोणी केलेय, याला जास्ती महत्त्व येते आणि बहुतांश लोकांची प्रतिक्रियाही आशयापेक्षा व्यक्तीसापेक्ष जास्ती असते.

मागच्या पिढीतील सिद्धहस्त नाटककार पत्रकार विद्याधर गोखले पत्रकारिता कमालीच्या गांभीर्याने करत. पण ती करताना त्यांच्या प्रखर विनोदबुद्धीचा प्रत्यय आल्यावाचून राहत नसे. मोठे संपादक असल्याने पत्रकारितेच्या वर्गात भावी पत्रकारांना शिकवताना ते संपादकीय लिहिताना पाळावयाची पथ्येही शिकवायचे. सर्वात महत्त्वाचं पथ्य ते सांगायचे आणि ते म्हणजे ठंडा करके खाओ…त्याचा अर्थ असा की कोणतीही घटना घडली की त्यावर लगेच तातडीने प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असे नाही. किंबहुना तातडीने प्रतिक्रिया देऊच नका. थोडं थांबा, श्वास घ्या आणि व्यक्त व्हा, असं ते सांगत. त्यांच्या शिकवणुकीची आठवण यायचं कारण म्हणजे आज मोबाइलच्या आणि टीव्ही वाहिन्यांच्या जमान्यात घटना घडल्याघडल्या ट्विट करण्याची अहमहमिका लागते. तीच गोष्ट वाहिन्यांना बाईट देण्याची. त्यातून मग अनेक गफलती होतात आणि हसंही होऊ शकतं.

राज्य सरकारने राज्यातल्या नागरिकांसाठी लस मोफत द्यायचं ठरवलंय की नाही, ठरवलं असलं तर ते जाहीर कोणी करायचं, अशा विषयांवरून राज्यातल्या आघाडी सरकारमधे तू तू मै मै, हा रोजचा खेळ पुढे सुरू आहे. शिवसेनेच्या युवराजांनी ट्विट केलं आणि ते डिलीटही करून टाकलं. राष्ट्रवादीच्या एका उत्साही मंत्र्यानं ही घोषणा टीव्हीवाल्यांसमोर केली आणि कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे ज्येष्ठतम मंत्री असलेल्या नेत्यानं त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा मुद्दा भारी होता आणि तो असा की सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी मोफत लस दिली जावी, असा आग्रह धरलाय आणि हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायला हवा होता पण श्रेयासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसनं असं करणं योग्य नव्हे, असं ते म्हणालेत. थोडक्यात, नागरिकांचं भलं यापेक्षा आमचा राजकीय स्वार्थ मोठा, हेच या ट्विट किंवा बाईट युद्धातून दिसून आलंय.

आपला चेहरा रोजच्या रोज टीव्हीवरून दिसला नाही तर काही पुढाऱ्यांना स्वतःलाच करोना झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे त्यांना, दिसला माइक दे बाईट आणि कळलं काही की कर ट्विट, या नव्या रोगाची लागण झालेली आहे. करोनातून माणसं बरी होतील पण या रोगातून बरी होणं अशक्य आहे. त्याचं प्रत्यंतर राज्यातल्या आघाडी सरकारच्या कारभारात रोजच्या रोज येतंय.

आलेली माहिती दे ढकलून पुढे किंवा आलं मनात की टाक व्हाट्स अपवर, हा रोग सार्वजनिक पातळीवरचा आहे. त्यात काही लोक रात्री झोपतानाही बोटाला मोबाइल चिकटवूनच झोपतात की काय, असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या वेळी व्हाट्स अप ग्रुपवर कोणी काही आक्षेपार्ह पोस्ट टाकली तर ग्रुप अँडमिनला जबाबदार धरण्यात येईल, असं जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आणि पोलीस खात्याचा माणूस व्हाट्स अँप ग्रुपवर राहील, असाही प्रकार झाला होता. उच्च न्यायलयाने या संदर्भात किमान ग्रुप अँडमिन्सना दिलासा दिलाय. ताज्या निकालात न्यायालयाने हे नमूद केलंय की ग्रुप अँडमिनच्या संगनमताने पोस्ट टाकली नसेल तर अँडमिनला जबाबदार धरता येणार नाही. थोडक्यात अशी पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीची ती जबाबदारी राहील. थोडक्यात आपले भविष्य आपल्या हाती…

जाता जाता
पुण्यातले एक तरुण संगणक अभियंते सुजीत भोसले (Sujit Bhosale) यांनी गेल्या वर्षभरात १३ वेळा प्लाझ्मा दान केलं असून त्याचा २६ रुग्णांना फायदा झाला आहे. विशेष म्हणजे हे प्लाझ्मा दान त्यांनी व्हाट्स अपवरून किंवा ट्विटद्वारे केलेले नाही, याची नोंद बाईटवाले ट्विटवाले आणि व्हाट्स अपवाले या सर्वांनी घ्यावी, ही विनंती.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button