सलमानच्या ‘तेरे बिना’मध्ये झळकलेली चिमुकली आहे ‘या’ मॉडेलची मुलगी

tere-bina-song-salman-khan-on-screen-daughter-sienna robinson

मुंबई : कलाकार मंडळी लॉकडाऊनमुळे आपापल्या घरी असले तरी सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करण्याचं काम ते व्यवस्थित करत आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानदेखील सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. लॉकडाऊन काळातच त्याचं आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं ‘तेरे बिना’ हे गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतंय.

या गाण्यात सलमान आणि जॅकलिनला चाहत्यांचं प्रेम मिळतंयच आहे; मात्र गाण्यामध्ये दिसणाऱ्या लहान मुलीबाबतही सर्वांना कुतूहल वाटतंय. मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच झळकलेल्या या मुलीबाबत सध्या इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झाल्याचे पाहायला मिळते आहे . या चिमुकलीचं नाव आहे ‘सिएना रॉबिनसन’. ती भारतीय मॉडेल वलुशा डिसूजा हिची मुलगी आहे. वलुशा आपल्या मॉडेलिंगच्या कारकिर्दीत ‘मिस इंडिया’सारख्या अनेक मानाच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे.

वयाच्या सतराव्या वर्षी ती किंग खान शाहरुखसोबत पेप्सीच्या जाहिरातीत झळकली होती. याशिवाय ह्यूंडई कार, जयपूर ज्वेल्स, लॉरियल, एवॉन हेअरकेअर नॅचरल्स अशा बड्या ब्रँड्सच्या जाहिरातींमध्येही तिने काम केले आहे. तसेच २०१६ साली शाहरुखच्या ‘फॅन’ चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दरम्यान वलुशाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत म्हणायचं झालं तर, तिने २००२ साली मॉडेल मार्क रॉबिनसन याच्याशी लग्नगाठ बांधली. मात्र २०१३ साली दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांना तीन मुले आहेत. सिएना तिघांपैकी सर्वांत लहान आहे.