भारत-चीन सीमेवर तणाव : पवारांनी थेट माजी सैन्य अधिकाऱ्यांशी केली चर्चा

Sharad Pawar

मुंबई : भारत-चीन सीमावादाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भारतीय हवाई दलाचे निवृत्त लष्करप्रमुख आणि माजी परराष्ट्र सचिव यांना चीन प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुंबईतील निवासस्थानी आमंत्रित केलं होतं. यावेळी त्यांनी भारतीय उपखंडाला सर्व दिशांनी चीन वेढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

मागील काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी ३१ ऑगस्टला चिनी सैन्याने पूर्व लडाखमधील सीमेवरील सहमतीचे उल्लंघन केले होते. चिनी सैनिकांनी प्रक्षोभकपणे सीमेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला; पण भारतीय सैनिकांनी सडेतोड उत्तर देत त्यांना परत पाठवले, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी भारताचे माजी हवाईदलप्रमुख भूषण गोखले आणि माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्याशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण उपस्थित होते. दक्षिण चीन समुद्रात चीनच्या हालचाली वाढल्या आहेत.

चीन भारताला सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. तसंच, ‘श्रीलंका आणि नेपाळच्या धोरणावरही अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, शरद पवार यांनी त्यांचे अनुभवही सांगत चीनच्या परिस्थितीवर लक्ष वेधलं. भारताची आर्थिक वाढ थांबवण्याचे चीनचे धोरण असल्याचे  शरद पवारांनी व्यक्त केले.

यापूर्वी, १५ जून रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झुंज झाली होती. त्यात २० भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असून तणाव कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER