
मुंबई : सामनाच्या अग्रलेखात यूपीएसोबत विरोधीपक्षांवर खरपूस टीका करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेस पुन्हा दुखावली. काँग्रेसचे नेते व मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी शिवसेनेला सुनावले – शिवसेना हा युपीएतील घटक पक्ष नाही, त्यामुळे शिवसेनेला युपीएबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. या संदर्भात उल्लेखनीय आहे की अधूनमधून शिवसेना (Shivsena) काँग्रेसला ढोसत असते आणि काँग्रेसचे नेते त्याबाबत निषेध नोंदवत असतात.
सामानाने म्हटले आहे – ३० दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याची कोणी दखल घेत नाही. … विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे. या पाटीलकीला कोणी गांभीर्याने घेत नाही. … देशातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमी पडतो आहे. लोकशाहीचे सध्या जे अधःपतन सुरू आहे त्यास भारतीय जनता पक्ष किंवा मोदी-शहांचे एककल्ली सरकार जबाबदार नसून निपचित पडलेला विरोधी पक्ष सर्वाधिक जबाबदार आहे. सद्यस्थितीत सरकारला दोष देण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. विरोधी पक्षालाही एक सर्वमान्य नेतृत्व असावे लागते. त्याबाबतीत देशातील विरोधी पक्ष संपूर्ण दिवाळखोरीच्या कडेलोटावर उभा आहे. राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ एक मोर्चा गुरुवारी काढला. … गेल्या पाच वर्षांत अशी अनेक आंदोलने झाली. त्यांची सरकारने गांभीर्याने दखल घेतली असे घडले नाही. ही विरोधी पक्षाचीच दुर्दशा आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अग्रलेखातील या मुद्द्यावरुन अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला सुनावले – शिवसेना हा युपीएतील घटक पक्ष नाही, त्यामुळे युपीएबद्दल शिवसेनेला बोलण्याचा अधिकार नाही. आमची आघाडी ही ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’च्या आधारावर बनली आहे. अद्यापही शिवसेना युपीएमध्ये सामिल झालेला पक्ष नाही. खुद्द शरद पवार यांनीही सोनिया गांधींचे नेतृत्व युपीएसाठी मान्य केले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला