शिवाजी महाराज यांच्या रात्रीत गुपगूप बसवलेल्या पुतळ्यावरुन तणाव

Shivaji Maharaj

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडे ता. शाहुवाडी येथे काल, रविवारी रात्री गुपचूपणे काही शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा स्थानकाजवळ बसवला. परवानगी नसताना पुतळा बसवल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेने प्रशासकीय यंत्रणाही खडबडून जागी झाली. बांबवडे दूरक्षेत्र पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असूनही पोलीसांना ही घटना समजली नव्हती. यानंतर मोठ्या बंदोबस्तात पोलीसांनी पुतळ्याची विधीवत पूजा करून हटविला. त्यामुळे मलकापूर आणि बांबवडे या दोन्ही बाजारपेठा उद्या, मंगळवारी कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आज दुपारी बारा वाजता शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रशासकीय परवानगी आणण्यासाठी प्रयत्न करू, सद्यस्थितीत पुतळा हटवू देणार नाही, असे सरुडकर यांनी स्पष्ट केले. यानंतर शाहुवाडीचे पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले, सहा.पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घेवून घटनास्थळी दाखल झाला.

यावेळी सर्व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य सभापती हंबीर पाटील, राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य विजय बोरगे, शाहुवाडी पंचायत समिती उपसभापती विजय खोत, बांबवडे सरपंच सागर कांबळे यांच्यासह अनेक शिवप्रेमी घटनास्थळी दाखल झाले. यासर्वांशी चर्चा करुन पोलीसांनी पुतळ्याची विधीवत पूजा करून हटविला. पुतळा बसविणे आणि त्यानंतर हटविण्याच्या प्रकारावरून शाहूवाडी तालुक्यात तणावाचे वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER