प्रज्नेशचे लक्ष्य यंदा टॉप- ५० चे !

क्रमवारीत शंभराच्या आत पोहचल्यावरचे पुढचे ध्येय

Tennis player Prajnesh aims Top 50

“जगातील आघाडीच्या १०० खेळाडूंमध्ये स्थान मिळवणे हे आपले पहिले ध्येय होते. ते साध्य झाल्यावर आता हे वर्ष संपण्याआधी पहिल्या ५० मध्ये पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी खूप म्हणजे खूपच चांगली कामगिरी करावी लागणार आहे. कुठपर्यंत पोहचता येते ते बघू या, ” हे २०१९ साठीचे ध्येय आहे प्रज्नेश गुन्नेश्वरनचे. तो आजच्या घडीला भारताचा नंबर वन टेनिसपटू आहे.

ही बातमी पण वाचा:- नाओमी ओसाका व प्रशिक्षक बाजीन वेगळे झाले

असोसिएशन अॉफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी) च्या ताज्या क्रमवारीत त्याने पहिल्या १०० मध्ये स्थान मिळविण्याचा टप्पा ओलांडला असून तो आता ९७ व्या स्थानी आहे. मेहनत घेत राहणे, संयम राखणे आणि विश्वास राखणे या गुणांनी २०१८ मध्ये मला मानसिकदृष्ट्या कणखर बनवले. अधिक मजबूत प्रतिस्पर्ध्यांशी मी खेळलो त्यामुळेच ही प्रगती झाल्याचे तो सांगतो.

GUNNESWARAN

२०१८ मध्ये त्याने दोन चॕलेंजर विजेतेपद पटकावली, आशियाडचे कांस्यपदक जिंकले, ग्रँड स्लॕम स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवले आणि तो भारताचा अव्वल टेनिसपटू बनला. आता क्रमवारीत ९७ व्या स्थानासह त्याने टॉप १०० मध्ये पोहोचलेल्या मोजक्या भारतीय खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. रामनाथन कृष्णन (क्रमांक ३ अनधिकृत क्रमवारी), रमेश कृष्णन (क्रमांक २७), विजय अमृतराज (क्र. १६), सानिया मिर्झा (क्र.२७), सोमदेव देववर्मन (क्र. ६२), युकी भांबरी (क्र.८८) यांच्या पंक्तीत त्याने स्थान मिळवले आहे. गेल्या दशकात अव्वल १०० मध्ये पोहोचलेला तो केवळ तिसरा भारतीय आहे.

जर्मनीतील अॕलेक्झांडर वास्क अॕकेडेमीत प्रशिक्षण घेणाऱ्या प्रज्नेशच्या खेळात अलीकडे आक्रमकता बघायला मिळत आहे. मैदानात खोलवर फटके मारण्यासही तो कचरत नाही. विशेष म्हणजे चांगली पाच वर्षे भारतीय टेनीस सर्किटमधून गायब राहिल्यावर त्याने ही मुसंडी मारली आहे. या काळात तो परदेशात प्रशिक्षण घेत होता. अनुभवी प्रशिक्षक एम. बालचंद्रन यांच्या मार्गदर्शनात त्याने विलक्षण प्रगती केली आहे. बालू सर २००५ पासून प्रज्नेशला जाणून आहेत. आम्ही त्याच्या सामन्यांची शूटींग बघून दुसऱ्या दिवशी सरावात त्या चूका सुधारायचो. याशिवाय जर्मन प्रशिक्षक ख्रिस्तियन बॉस यांनीसुध्दा त्याचा खेळ सुधारला आहे.

आता क्रमवारीत टॉप १०० मध्ये पोहचल्याने प्रज्नेशला अधिकाधिक दर्जेदार आणि आघाडीच्या खेळाडूंशी त्याला खेळायला मिळेल. ग्रँड स्लॕम स्पर्धांच्या मेन ड्रॉमध्ये त्याला आपोआप स्थान मिळत जाईल आणि या संधींचा त्याला टॉप- ५० चे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी फायदाच होईल, त्याला फक्त एकच करायचे आहे..आपल्या कामगिरीत सातत्य राखायचे आहे.