सेरेनासाठी यंदा टेनिस संपले; फ्रेंच ओपनमधून माघार

Serena Williams

सेरेना विल्यम्सची (Serena Williams) 24 व्या ग्रँड स्लॅम अजिंक्यपदाची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. टाचेच्या दुखापतीमुळे तिने दुसऱ्या फेरीच्या सामन्याआधी फ्रेंच ओपन (French open tennis) स्पर्धेतून माघार घेतली आहे. वयाची ३९ वर्षे पार केलेल्या सेरेनाला आता यंदा आणखी ग्रँड स्लॅम स्पर्धेची संधी नाही आणि जानेवारीत होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्येच तिला मार्गारेट कोर्ट यांच्या 24 स्लॅम अजिंक्यपदांच्या विक्रमाची बरोबरी करायची संधी मिळणार आहे.

यंदा कोरोनामुळे बऱ्याच आघाडीच्या खेळाडूंनी यूएस ओपन व फ्रेंच ओपनमध्ये सहभागी होण्याचे टाळल्याने सेरेनाला संधी होती; पण यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत ती बाद झाली तर आता तिला दुसऱ्या फेरीआधीच माघार घ्यावी लागली आहे.

माघारीचे कारण ठरलेल्या टाचेच्या दुखण्याबद्दल तिने म्हटलेय की, मला चार ते सहा आठवडे निव्वळ बसून राहावे लागणार आहे. दोन आठवडे तर फारच काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मी यंदा आणखी एखादी तरी स्पर्धा खेळू शकेल का, याबद्दल शंकाच आहे.

सेरेनाचा दुसऱ्या फेरीचा सामना स्वेताना पिरोन्कोव्हा हिच्याशी होता. यंदाच यूएस ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये सेरेनाने या दोन माता खेळाडूंच्या लढतीत विजय मिळवला होता.

सेरेना म्हणाली की, मी येथे खेळण्यास उत्सुक होते; पण यूएस ओपननंतर लगेचच ही स्पर्धा असल्याने सावरण्यास वेळच मिळालेला नाही. मी कशी तरी मात करून खेळायला आले होते; पण मी दीर्घकाळ खेळू शकेल असे वाटत नाही. मला चालायलासुद्धा जमत नाही. म्हणून विश्रांती घेणेच योग्य आहे.

सेरेनाने तीन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. पहिल्या फेरीत तिने ख्रिस्ती आन हिच्यावर ७-६, ६-० असा विजय मिळवला होता. २०१८ च्या फ्रेंच ओपनमध्येही सेरेनाने चौथ्या फेरीच्या सामन्याआधी माघार घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER