राज्यातील धार्मिक स्थळं आजपासून भाविकांसाठी खुली

Tempel

मुंबई : आठ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरं पुन्हा खुली करण्याची परवानगी शासनातर्फे देण्यात आली आहे. मंदिरं खुली करण्याची परवानगी देण्यात आलेली असली तरीही कोरोनापासून बचावासाठी शक्य त्या सर्व परिंनी काळजी घेतली जाणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंदिरं खुली करण्याची घोषणा केल्यानंतर आता मंगल पर्वातच पुन्हा एकदा देवाच्या दारी जाऊन भाविकांना दर्शन घेता येणार आहे. पण त्यासाठी मंदिरात येताना भाविकांनी मास्क लावणं, सोशल डिस्टनसिंग पालन करणं, आरोग्य सेतू ऍप वापरणं आवश्यक असून, कोरोनाच्या नियमांचं पूर्ण पालन करणं अशा अटी राज्य सरकारकडून लागू करण्यात आल्या आहेत.

शासनाचे सर्व नियम पाळून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्याची तयारी मंदिर प्रशासन करीत आहे, असे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सांगितले. दर्शनासाठी मुखपट्टी बंधनकारक आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षित अंतर नियम पाळून एका वेळी मोजक्या भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, सभामंडपात बसण्याची परवानगी सध्या कोणालाही देण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

तुळजापूर येथील महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांसाठी खुले होत आहे. देवीचे मंदिर पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. दर दोन तासांनी ५०० भाविकांना दर्शन घेता येईल. दर्शनासाठी भाविकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन पास घेणे गरजेचे आहे. मंदिरात दररोज चार हजार भाविकांनाच प्रवेश मिळणार आहे. त्यात एक हजार सशुल्क, तर तीन हजार जणांना मोफत मंदिरप्रवेश असेल, असे तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी सांगितले.

कोल्हापुरातील करवीर निवासिनी महालक्ष्मी आणि दख्खनचा राजा जोतिबा ही दोन प्रमुख मंदिरेही भाविकांसाठी सज्ज आहेत. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये आजपासून भाविकांना दर्शन घेता येणार आहे. भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार देवस्थानाने नियमावली तयार केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER