अयोध्येतील मंदिर उभारणी, लोकवर्गणी आणि राऊत यांची पोटदुखी

Ayodhya Ram Mandir-Sanjay Raut

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी लोकवर्गणी गोळा करण्याचे काम 14 जानेवारी पासून म्हणजे संक्रांति पासून सुरू करण्यात येणार आहे देशभरात 4 लाख स्वयंसेवक घरोघरी फिरून ही वर्गणी गोळा करतील. अगदी दहा रुपये देण्याची ऐपत असलेल्या व्यक्तीकडूनही वर्गणी गोळा केली जाईल. या मागचा उद्देश असा की तमाम भारतीयांच्या श्रद्धा व भक्तीचे प्रतीक असलेल्या राम मंदिराची उभारणी ही लोकवर्गणीतून व्हावी. या मंदिराच्या उभारणीसाठी तीनशे कोटी रुपये खर्च येणार असून अयोध्येत हे काम सुरू झाले आहे. जगभरातील हिंदूंच्या भावनांचे प्रतीक म्हणजे हे मंदिर आहे आणि त्याची उभारणी लोकवर्गणीतून होत असेल तर एका महान धार्मिक कार्यासाठी सामूहिक सामाजिक योगदानाचे ते अनोखे उदाहरण ठरणार आहे. राजकारणापलीकडे जाऊन अशा सामूहिक योगदानाचे कौतुकच करायला हवे. परंतु चांगल्या गोष्टींचे अभावानेच कौतुक करणारे शिवसेनेचे नेते व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांना इथे तरी कौतुक कसे करावेसे वाटेल?

सोमवारच्या अंकात त्यांनी लेखणी परजली. “अयोध्येतील राम मंदिर हे लोकवर्गणीतून उभारले जाईल असे कधी ठरले नव्हते पण आता लोकवर्गणीचा विषय साधा नाही तो राजकीय आहे” असा जावईशोध राऊत यांनी अग्रलेखात लावला आहे. “वर्गणीसाठीचे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024 चा निवडणूक प्रचार आहे” असा सर देखील राऊत यांनी मांडला आहे.

राऊत यांच्या भूमिकेवर भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी तर सडकून टीका केलीच पण सोशल मीडियाताही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक नेटकऱ्यांनी राऊत यांना खडे बोल सुनावले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच हिंदुत्वाची कास धरली. “जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो” अशी त्यांच्या भाषणाची सुरुवात असायची. देशातील तमाम हिंदूंचे मजबूत संघटन झाले पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला. आता राम मंदिर उभारणीच्या निमित्ताने फुल ना फुलाची पाकळी म्हणून जर समस्त हिंदू बांधव योगदान देणार असतील तर राऊत यांच्या पोटात का दुखावे असा सवाल सोशल मीडियात करण्यात आला. या लोकवर्गणीच्या माध्यमातून हिंदूंच्या एकतेची वज्रमूठ दिसणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण ट्रस्टच्या माध्यमातून ही राम वर्गणी गोळा करण्यात येणार आहे. अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी व्हावी यासाठी लाखो कार सेवकांनी आंदोलन केले,लाठ्याकाठ्या खाल्ल्या जनजागृती केली. 1990 पासूनच्या संघर्षात जे हजारो कार्यकर्ते स्वयंसेवक रामभक्त सहभागी झाले तेच किंवा त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेली स्वयंसेवक मंडळी आता लोकवर्गणी गोळा करून राम मंदिराची उभारणी करणार असतील तर त्याबद्दल त्यांनी आकस बाळगण्याचे कारण नाही, असे खडे बोलही राऊत यांना सोशल मीडियात सुनावण्यात आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर शिवसेना महाराष्ट्रात सत्तेत असल्यामुळे या राम वर्गणीचे समर्थन करण्यात राऊत यांना अडचण येत असावी असा टोलाही लगावला गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER