राज्य सरकारच्या कृषी योजनांची तेलंगणाच्या कृषिमंत्र्यांकडून स्तुती

Niranjan Reddy

मुंबई : तेलंगणाचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन महाराष्ट्र सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या कृषी योजनांची स्तुती केली. सह्याद्री अतिथीगृहावर रेड्डी यांनी कृषीमंत्र्यांची भेट घेतली. फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, तेलंगणाच्या पणन संचालक श्रीमती लक्ष्मी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र फळबाग लागवडीत देशात प्रथम स्थानावर असून त्या बाबतीत महाराष्ट्राकडून मार्गदर्शन घेण्यासाठी विशेष भेटीवर आल्याचे तेलंगणाचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण हितासाठी राज्य शासन विविध योजना राबवित असून या क्षेत्रात तेलंगणा राज्याच्या कृषी विभागाच्या अभिनव योजनांचा अभ्यास केला जाईल, असं महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं.

कृषी क्षेत्रात महाराष्ट्राकडून शिकण्यासारखे खूप असून महाराष्ट्र दौरा त्यासाठी लाभदायी ठरेल, असा आशावाद कृषिमंत्री रेड्डी यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘विकेल ते पिकेल’ या अभियानाचे विशेष कौतुक त्यांनी यावेळी केले. तसंच त्यांनी तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी सादरीकरणादरम्यान महाराष्ट्रातील विविध कृषी योजनांची माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER