तेजस्विनीची दुबई वारी जोरात

तेजस्विनीची दुबई वारी जोरात

खूप खूप शूटिंग केल्यानंतर किंवा एखाद्या मालिकेच्या सतरा-अठरा तासांच्या शेड्युलमधून कंटाळा आल्यानंतर कलाकारांना एक ब्रेक हवा असतो. खरं तर मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर कलाकारांच्या हातात खूप मोठा ब्रेक होता. परंतु या ब्रेकमध्ये ते कुठेही फिरायला जाऊ शकतील अशी परिस्थिती नव्हती. आता अनलॉक झाल्यानंतर आणि थोडी थोडी चित्रीकरणासाठीची वाट मोकळी झाल्यानंतर कलाकारांची भटकंतीदेखील सुरू झाली आहे.

सध्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही दुबई वारी करत असून दुबईतल्या आकर्षक गार्डनमधील वेगवेगळ्या पोझमधील फोटो तिने चाहत्यांसाठी सोशल मीडिया पेजवर शेअर केले आहेत. तेजस्विनीचे हे दुबईतील फोटो बघून तिला हैप्पी जर्नी करायला तिचे चाहते नक्कीच विसरले नाहीत. आई अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्याकडून अभिनयाचा वारसा घेऊन अभिनयाच्या क्षेत्रामध्ये आलेल्या तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit)स्वतः एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

‘अग बाई अरेच्या’ या केदार शिंदे (Kedar Shinde)यांच्या सिनेमापासून तिची कारकीर्द सुरू झाली. सुरुवातीला ठरावीक पठडीतल्या भूमिका केल्यानंतर तिने गंभीर भूमिकातही आपण कमी नाही हे दाखवून दिले. ‘मी सिंधूताई सपकाळ’ या सिनेमातील ‘सिंधूताई’ यांच्या भूमिकेतून सिंधूताईसारख्या अत्यंत संघर्षमय आयुष्य वेचलेल्या एका महिलेची व्यक्तिरेखा तेजस्विनीने तिच्या अभिनयाच्या माध्यमातून लीलया पेलली होती. त्यानंतर ‘तुही रे’, ‘येरे येरे पैसा’ या सिनेमातूनही तेजस्विनी दिसली होती. नेमके आणि मोजके काम करण्यात तेजस्विनीला अधिक रस असल्याने तिने आजवर भारंभार सिनेमे जरी केले नसले तरी मोजक्या आणि नेमक्या कामातून तिने तिच्या अभिनयाची छाप रसिकांवर सोडली आहे. अभिनयासोबत तेजस्विनीचा स्वतःचा एक डिझाईनर साड्यांचा ब्रँडदेखील आहे.

अभिनेत्री आणि मैत्रीण अभिज्ञा भावे हिच्यासोबत तेजस्विनी डिझायनर साड्यांचा ब्रँड चालवते. या दोघींनी डिझाईन केलेल्या वेगवेगळ्या साड्या अनेक जणी स्टाईल स्टेटमेंट म्हणून मिरवत असतात. विशेषतः खणच्या साड्यांमध्ये तिने ट्रॅडिशनल आणि आधुनिक लूक देत एक नवे क्रिएशन साड्यांच्या मार्केटमध्ये आणले आहे; शिवाय ती स्वतःदेखील स्टाईल आणि फॅशनबाबत सतत नवनवे प्रयोग करत असते. वास्तविक जीवनामध्ये तेजस्विनी बिनधास्त मुलगी असून शालेय वयात तिने खूप संघर्षमय जीवन व्यतीत केले आहे. स्वतःच्या कष्टाने तिथपर्यंत पोहचली आहे याचा तिला खूप अभिमान आहे. सध्या तेजस्विनी दुबईच्या वारीवर गेली असली तरी ती नेमकी फिरायला गेली आहे, कुठल्या सिनेमाच्या शूटिंग करण्यासाठी गेली आहे हे तिने अजून तिच्या चाहत्यांना सांगितले नाही.

मात्र तिच्या फोटोवरून ती सध्या धमाल करत असल्याचे दिसून येत आहे. तेजस्विनी सांगते, कुठल्याही व्यक्तीला त्याच्या कामाच्या व्यापातून एक ब्रेक मिळणं खूप गरजेचं असतं. हा ब्रेक त्या व्यक्तीला टॉनिक देणारा असतो. पुढच्या कामासाठी ऊर्जा देणारा असतो . आणि कधी हा ब्रेक पर्यटनातून तर कधी तिच्या छंदामधून मिळेल; पण प्रत्येक व्यक्तीने अशा पद्धतीने स्वतःला वेळ देण्याची गरज असते. दुबई ट्रीपमध्ये तेजस्विनीच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहिल्यानंतरदेखील असे दिसून येते की, तेजस्विनी सध्या तिचा हा सुटीचा काळ मजेत जगत आहे. यानंतर जेव्हा ती भारतात परत येईल तेव्हा अभिनय असेल किंवा तिचे साडी क्रिएशन असेल यामध्ये नक्कीच काही तरी नवं पाहायला मिळेल यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER