महाराष्ट्रात कोणाला मिळालं नसेल, एवढं मताधिक्य आदित्य ठाकरेंना मिळेल – तेजस ठाकरे

मुंबई : राजकारणापासून अलिप्त असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे मात्र यंदाच्या निवडणुकीत सभांच्या व्यासपीठावर दिसून येत आहेत. वरळी मतदारसंघात मोठा भाऊ आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी तेजस ठाकरे यांनी उडी घेतली आहे. महाराष्ट्रात कोणत्याही आमदाराला मिळालं नसेल, एवढं मताधिक्य आदित्य ठाकरेंनाप्राप्त होऊन निवडून येतील, असा विश्वास तेजस ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला.

माझ्या शुभेच्छा आदित्य ठाकरे यांच्यासोबत सदैव आहेत. सर्व उमेदवारांच्या सोबत आहेत. २४ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात फडकणार. १२४ जागांपैकी किती जागांवर विजय मिळेल? असा प्रश्न विचारला असता १२४ वगैरे काही नाही. शिवसेना-भाजपची महायुती आहे. त्यामुळे अख्खा महाराष्ट्र भगवा होणार, महाराष्ट्राने कधी पाहिलं नसेल इतकं मताधिक्य आदित्य ठाकरेंना मिळेल, असा विश्वास तेजस यांनी व्यक्त केला. जे शिवसैनिक महाराष्ट्रभर काम करत आहेत, त्यांना तुम्ही जनतेला प्रेम देत राहा, लोक तुम्हाला प्रेम देतील, असा संदेश तेजस ठाकरेंनी दिला.

प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे. जर मी निसर्ग संवर्धनाच्या माध्यमातून ते करत असेन, तर मला राजकारणात उतरण्याची गरज भासली नाही. सरडे-खेकड्यांच्या प्रजातींना माझं नाव देण्याचा उद्देश नाही, पण सह्याद्रीच्या रांगांकडे किती लक्ष वेधलं जातं आणि संरक्षण मिळतं, यात समाधान आहे. राजकारणात प्रवेश करण्याचा तूर्तास काही विचार नाही. सध्या मी शिक्षण घेत आहे. निवडणुका आल्यामुळे घरात राजकीय वातावरण आहे. अशातला भाग नाही. निवडणुका सतत सुरुच असतात, त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणे आमच्याही घरात चर्चा होतात, असं तेजस यांनी सांगितलं.

दरम्यान, यावेळी आरेबाबत बोलताना तेजस ठाकरे म्हणाले की, आरेमध्ये मी किती वर्ष फिरतो, माझं काम तिथे सुरु आहे, पक्षप्रमुखांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आरे कोणत्याही परिस्थितीत वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. माझ्यासारखे अनेक वन्यजीव प्रेमी या लढाईत एकत्र आहोत. तसेच वन्यजीव संशोधनात माझं नाव महत्वाचं नसून माझ्यामुळे सह्याद्रीच्या रांगांना संरक्षण आणि त्याठिकाणी लक्ष केंद्रीत होत असेल तर ते महत्वाचं आहे. परंतु मी राजकारणात सहभागी नसल्यामुळे वचननाम्यात ‘आरे’चा उल्लेख नसल्याविषयी बोलू शकणार नाही, असं तेजस ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.