टीम इंडियाचे विमान मुंबईत लँड होण्यामागे पवारांची ‘पॉवर’

मुंबई : ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी मालिका विजयानंतर टीम इंडियाचे (Team India) खेळाडू गुरुवारी मायदेशी परतले. कर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर (Ajinkya Rahane, Rohit Sharma, Prithvi Shaw, Shardul Thakur) आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) हे मुंबईत व्हाया दुबई दाखल झाले असून त्यांना मुंबई महानगरपालिकेनं होम क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे. दरम्यान, शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर टीम इंडियाचं विमान मुंबईत उतरल्याचं सांगण्यात येत आहे.

बायो बबलमुळं टीम इंडियाला क्वारन्टाईन होणे बंधनकारक होते. त्यामुळं मुंबई एअरपोर्टवर टीम इंडियाचं विमान उतरण्याची परवानगी आधी मिळाली नव्हती. मात्र ही माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना मिळताच त्यांनी सूत्रं हलवली. त्यांच्या प्रयत्नानंतर टीम इंडियाचं विमान मुंबईत लँड परवानगी देण्यात आली. अन्यथा टीम इंडियाचं विमान थेट चेन्नईत उतरलं असतं. आज सकाळी टीम इंडियाचा विजयीवीर अजिंक्य रहाणेचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं. भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमीत २-१ ने पराभव करून, बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेवर नाव कोरलं. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा अत्यंत यशस्वीपणे सांभाळलेल्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही ऐतिहासिक कामगिरी केली. या जबरदस्त कामगिरीनंतर अजिंक्य रहाणेचं मुंबई नगरीत जंगी स्वागत करण्यात आलं.

अजिंक्य रहाणेच्या माटुंग्यातील घराजवळ ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. यावेळी अजिंक्यची सोसायटीच नव्हे तर संपूर्ण देश हे त्यांचं कुटुंब बनलं होतं. आपल्या कुटुंबातील विजयीवीर परततोय, त्याच आवेशात त्याचं स्वागत करण्यात आलं. यावेळी अजिंक्य रहाणेची चिमुकली लेक सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. बापाला पाहून चिमुकली अजिंक्य रहाणेला बिलगली. दरम्यान, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा नियम मुंबईत आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना कडक निर्बंध घालून सक्तीने ७ ते १४ दिवस क्वारंटाईन केलं जातं. मात्र तब्बल पाच महिन्यांनी मुंबईत परतणाऱ्या आणि जगात भारताचा झेंडा डौलाने फडकवणाऱ्या टीम इंडियाच्या या योद्ध्यांसाठी क्वारंटाईनची बाउंड्री लावण्यात आली नाही. अजिंक्य रहाणेच्या गावात जल्लोष साजरा होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील चंदनापुरी या अजिंक्य रहाणेच्या गावात गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचल्याने, गावकऱ्यांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. अजिंक्य रहाणेच्या घरी फटाके फोडून सेलिब्रेशन करण्यात आलं. इतकंच नाही तर पेढे वाटून गावकऱ्यांनी आनंद साजरा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER