टीम इंडियाला आता आश्चर्याचे धक्के देण्याची सवयच झालीय…!

washington sundar & Shardul Thakur

आॕस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ कमाल करतोय.जो पूर्ण ताकदीचा संघ होता तो 36 धावातच गुंडाळला गेला होता आणि जो राखीव खेळाडूंसह संघ खेळतोय तो आॕस्ट्रेलियन्सच्या नाकीनऊ आणतोय. एकाप्रकारे हा आॕस्ट्रेलिया दौरा आणि त्यातील दुखापती ही इष्टापत्तीच म्हणायला हवी कारण एरवी नियमीत संघ खेळला असता तर आपण या खेळाडूंचा विचारच केला नसता. प्रतिभावान भारतीय खेळाडू समोर आणण्यात हा दौरा माईलस्टोन ठरलाय असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.

कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाला प्रतिस्पर्ध्यांचे शेपूट त्रासदायक ठरते आणि आपले शेपूट तसे वळवळतच नाही हा तसा नेहमीचा अनुभव पण यावेळी ब्रिस्बेन (Brisbane) कसोटीत आपले शेपूट चांगलेच वळवळले. आपल्या पहिल्या पाच गड्यांनी 161 आणि नंतरच्या पाच गड्यांनी 175 धावांची धावांची भर घातली हा याचा पुरावा.

खरं तर 6 बाद 186 अशा अवस्थेत टॉप आॕर्डर परत धाडल्यावरआॕस्ट्रेलियाला मोठ्या आघाडीची स्वप्नं पडू लागली होती, कारण पहिलाच सामना खेळणारा वाॕशिंग्टन सुंदर (Washington Sundar) , दुसराच सामना खेळणारा शार्दुल ठाकुर (Shardul Thakur), नवदीप सैनी, मोहम्मद सिराज व गेल्या 10 डावात खातेसुध्दा खोलू न शकलेला नटराजन हे काय प्रतिकार करणार असे स्टार्क, हेझेलवूड, कमिन्स व लियान सारखा मारा असणाऱ्या आॕस्ट्रेलियन्सना (Australia) वाटणे स्वाभाविक होते.

तसे अॕडिलेड कसोटीत 36 धावात गुंडाळल्यावर मालिका 4-0 अशी जिंकू अशी स्वप्नं त्यांना पडलीच होती पण मेलबोर्नमधला विजय आणि सिडनीतल्या प्रतिकारानंतर पुन्हा एकदा लढाऊ टीम इंडियाने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला.

वाॕशिंग्टन सुंदर व शार्दुल यांनी सातव्या गड्यासाठी तब्बल 123 धावांची भागिदारी केली आणि 6 बाद 186 वरुन भारताने 336 धावांपर्यंत मजल मारली. आॕस्ट्रेलियाची आघाडी 33 धावांपुरती मर्यादीत राहिली यासाठी धन्यवाद शार्दुल ठाकुर व वाॕशिंग्टन सुंदर यांना. शार्दुल ठाकुरने 115 चेंडूत 67 धावा आणि वाॕशिंग्टन सुंदरने 144 चैंडूत 62 धावा केल्या आणि कितीतरी वर्षात आॕस्ट्रेलियन्सना शेपूट वळवळणे काय असते याचा अनुभव आला.

मुळात सुंदर व ठाकूर हे दोघे कसोटी सामन्यात खेळतील अशी या मालिकेच्या सुरुवातीला कल्पना तरी कुणी केली होती का? आणि खेळले तरी ते गोलंदाज म्हणून संघात आले. फलंदाजीत त्यांच्याकडून अशी अपेक्षा कुणाला होती का? , पण या दौऱ्यावर भारतीय संघाकडून आता अशा आश्चर्याच्या धक्क्यांची सवय झाली आहे. त्यामुळे आॕस्ट्रेलियाने 1988 पासून ब्रिस्बेन इथे सामना गमावलेला नसला आणि भारताने अद्याप इथे कसोटी सामना जिंकलेला नसला तरी आता तसे घडले तर आश्चर्य वाटायला नको.

सुंदर व ठाकुर यांनी फलंदाजीत अर्धशतके झळकावुन आश्चर्याचा धक्का देण्याआधी गोलंदाजीतही आपली कामगिरी चोख बजावली होती. दोघांनीही प्रत्येकी तीन विकेट काढल्या आणि पहिल्यांदाच आॕस्ट्रेलियातील एकाच कसोटी सामन्यात दोन भारतीय खेळाडूंनी अशी अष्टपैलू कामगिरी केली. एवढेच नाही तर वाॕशिंग्टन सुंदर हा तर कसोटी पदार्पणातील पहिल्याच डावात अर्धशतक आणि पहिल्याच डावात तीन बळी मिळवणारा एकूण नववा अष्टपैलू ठरला. भारतातर्फै त्याच्याआधी केवळ दत्तु फडकर (Dattu Phadkar) व हनुमा विहारी (Hanuma Vihari) यांनी कसोटी सामन्याच्या पदार्पणात एका डावात अशी अष्टपैलु कामगिरी केली होती.

शार्दुल व सुंदर हे नियमीत फलंदाज नाहीतच मूळी. शार्दूलने याच्याआधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 100 पेक्षा अधिक चेंडू चाललेली खेळी केवळ दोन वेळा आणि वाॕशिंग्टन सुंदरने चार वेळा केलेली आहे. वाॕशिंग्टनच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक शतकही आहे जे त्याने 2017 मध्ये त्रिपुराविरुध्द केले होते. पण गेल्या तीन वर्षापासून तो प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेला नाही आणि कोरोना व बायोबबलच्या नियमामुळे नशिबाने त्याला संधी मिळाली आणि त्या संधीचे त्याने सोने केले आहे. रविंद्र जडेजा इंग्लंडविरुध्द किमान पहिले दोन सामने खेळू शकणार नाही हे स्पष्ट झाल्यावर आता वाॕशिंग्टनने त्या स्थानासाठी दावा मजबूत केला आहे. एरवी अक्षर पटेलची चर्चा होती पण या दमदार पदार्पणाने आता अक्षर मागे पडला आहे आणि वाॕशिंग्टन जवळपास निश्चित झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER