बारावीच्या परीक्षेचे पेपर तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार

teachers Boycott on paper examination of class XII

कोल्हापूर : शासनाकडून गेल्या वीस वर्षापासून वेतन न घेता उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे २२५०० विनाअनुदानित शिक्षक पेपर तपासणीचे काम करत आहेत. एचएससी बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. अनुदान पात्र उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाला शंभर टक्के अनुदान जाहीर करा आणि शासन स्तरावर पात्र अघोषित कनिष्ठ महाविद्यालय घोषित करून अनुदान जाहीर करा, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील विनुदानित शिक्षकांनी पेपर तपासणी बहिष्काराचे अस्त्र उपसले आहे.

महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये २००१ पासून विनाअनुदानित धोरणाचा विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. गेली वीस वर्षे विद्यार्थ्यांना भरमसाठ फी भरून अकरावी आणि बारावी शिक्षण घ्यावे लागत आहे. तर विनाअनुदात शिक्षकांना बिनपगारी काम करावे लागत आहे. या कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान सुरू करण्यासाठी शिक्षक झगडत आहेत. यासाठी दोनशेहून अधिक आंदोलन , मोर्चे, उपोषणानंतर कायम विनाअनुदानित तत्त्वावरील या कनिष्ठ महाविद्यालयांचा २६ फेब्रुवारी २०१४ मध्ये कायम शब्द वगळला. तर ४ जून २०१४ ला मुल्यांकनास सुरवात झाली.

मुल्यांकनाच्या जाचक अटी पार केल्यानंतर पहिल्या टप्यामध्ये १४६ अनुदान पात्र तर दुसऱ्या टप्प्यामध्ये १३ सप्टेंबर २०१९ ला १६३८ कनिष्ठ महाविद्यालये अनुदानास पात्र झाली आहेत. तर अघोषित असणारी शासनस्तरावर सुमारे ४५० कनिष्ठ महाविद्यालय अनुदान पात्र आहेत. अशी परिस्थिती असताना केवळ शिक्षकांना केवळ आश्वासन मिळत आहेत. मागण्या मान्य होत नसल्यामुळेच शिक्षकांनी पेपर तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.