मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिक्षक दाम्पत्याला अज्ञात वाहनाने चिरडले

Road Accident

लातूर :- लातूर जिल्ह्यातल्या शिरूर ताजबंद येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शिक्षक दाम्पत्याला भरधाव वाहनाने चिरडले. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पतीचा उपचारासाठी नेताना मरण पावले.

पोलिस आणि ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार मूळचे वाढवणा येथील रहिवासी असलेले श्रावण रामराव सोमवंशी (52) आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा सोमवंशी (48) हे दोघेही वळसंगी येथील जिल्हा परीषदेच्या शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. सोयीसाठी त्यांनी चार किमी अंतरावर असलेल्या शिरूर ताजबंद या चौरस्त्यावरील गावात घर केले होते. बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे पहाटेच मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. शिरूर ताजबंद ते मुखेड या राज्य महामार्गावर ते फिरण्यासाठी गेले. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना ठोकरले. यामध्ये प्रतिभा यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे वाहनचालक घाबरून फरार झाला. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी जखमी अवस्थेतील श्रावण सोमवंशी यांना तातडीने अहमदपूरच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी नेले. परंतू रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याच रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे रूंदीकरण होऊन दर्जेदार रस्ता बनवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालक बेफाम आणि बेदरकारपणे वाहने चालवत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली आहे.