
मुंबई : नवीन मुंबईतील कळंबोली येथील सेंट जोसेफ हायस्कूलमधील एक शिक्षक फिरोज इब्राहीम राऊत्तर यांची मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) बलात्काराच्या खटल्यातून ११ वर्षांनी अपिलात निर्दोष मुक्तता केली आहे.
या शाळेत तिसºया इयत्तेत शिकणाºया एका विद्यार्थिनीवर स्वच्छतागृहात नेऊन १२ जून २०१० रोजी बलात्कार केल्याच्या आरोपावरून फिरोज यांच्यावर खटला भरला गेला होता. त्यात त्यांना दोषी ठरवून रायगडच्या सत्र न्यायालयाने २६ नोव्हेंबर, २०१३ रोजी जन्मठेप व १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. त्या दिवसापासून फिरोज कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात होते. या निकालाविरुद्ध फिरोज यांनी केलेले अपील मंजूर करून न्या. साधना जाधव व न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
शाळेत फिरोज इयत्ता ११ वी १२ वीच्या वर्गांना प्राणीशास्त्र हा विषय शिकवत असत. पीडित मुलीने दिलेल्या माहितीवरून तिच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार ही पीडित मुलगी त्या दिवशी तिच्या एका मैत्रिणीसोबत चौथ्या मजल्यावरील मुलींच्या स्वच्छतागृहात गेली असता दोन शिक्षकांनी तिला हाताला धरून जबरदस्तीने आत ओढत नेले होते. त्यापैकी एकाने तिचे तोंड दाबून धरून दुसºयाने तिच्यावर बलात्कार केला होता. पीडित मुलीचा वर्ग तळजल्यावर होता व ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडल्याचे तिचे म्हणणे होते.
आरोपी फिरोजने स्वत: साक्षीदाराच्या पिंजºयात उभे राहून साक्ष दिली होती. शिवाय शाळेच्या प्राचार्या, पर्यवेक्षिका व पीडित मुलीच्या वर्गशिक्षिकेने फिरोज यांच्या बाजूने साक्षी दिल्या होत्या. प्रामुख्याने त्याच आधारे खंडपीठाने त्यांना निर्दोष सोडताना म्हटले की, आरोपीने उभ्या केलेल्या साक्षीदारांच्या साक्षी दुर्लक्षित करता येणार नाहीत किंवा हे साक्षीदार शाळेचे कर्मचारी आहेत एवढ्यानेच त्यांच्या साक्षींविषषयी संशयही घेता येणार नाही. हे साक्षीदार शाळेत जबाबदारीच्या पदांवर असल्याने शाळेची प्रतिष्ठा व पीडितेचे हित याची त्यांनाही नक्कीच काळजी असणार.
आरोपीच्या विषयाची प्रयोगशाळाही चौथ्या मजल्यावर मुलींच्या स्वच्छतागृहाच्या जवळच होती. त्यामुळे हे कृत्य आरोपीनेच केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे पब्लिक प्रॉसिक्युटरचे म्हणणे अमान्य करताना खंडपीठाने म्हटले की, आरोपीचा गुन्हा शक्यतांनी सिद्ध होत नाही. त्यासाठी ठोस पुरावा लागतो. अभियोग पक्षाने मांडलेला अभियोग केवळ खराही असण्याची शक्यता पुरेशी नसते. ‘खरेही असू शकते’ आणि ‘हेच खरे आहे’ यात खूप अंतर आहे व हा प्रवास अभियोग पक्ष फक्त नि:संशय असे सबळ पुरावे देऊनच यशस्वीपणे पूर्ण करू शकतो.
आरोपी फिरोज यांना निर्दोष ठरविताना न्यायालयाने प्रामुख्याने पुढील बाबी विचारात घेतल्या:
-पीडित मुलीने सर्वप्रथम तिच्या आईला सांगितले तेव्हा चित्रकलेच्या शिक्षकांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. तिचे आई आणि वडील शाळेत आले तेव्हाही प्राचार्य मॅडमसमोर तिने चित्रकलेच्या शिक्षकांचेच नाव घेतले. पोलिसांकडेही तिने आधी चित्रकलेच्या शिक्षकांबद्दलच तक्रार केली होती.
-प्राचार्यांनी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाºयांची नावे व फोटो असलेले रजिस्टर मागवून पीडित मुलीस यापैकी कोणी अत्याचार केला असे विचारले तेव्हा मुलीने शाळेचे कार्यालय प्रमुख श्री. वर्गीज यांच्या फोटोवर बोट ठेवले होते. परंतु ‘वर्गीज यांना आम्ही चांगले ओळखतो. ते असे काही करणे शक्यच नाही,’ असे म्हणून मुलीच्या वडिलांनीच तिचे म्हणणे खोडून काढले. त्यानंतर पोलिसांकडे फिर्याद करताना अचानक आरोपी म्हणून फिरोज यांचे नाव घेतले गेले
-ही कथित घटना त्या दिवशी दु. ४ वाजता घडली होती. पण फिरोज त्या दिवशी ड्युटी संपवून, प्राचार्यांच्या टेबलावर ठेवलेल्या मस्टरवर सही करून दु. ३ वाजताच शाळेतून बाहेर पडले होते.
-मुलीचे आई-वडील सुरुवातीस पोलिसांत फिर्याद न करता प्रकरण मिटविण्याच्या मताचे होते. पण शाळेनेच आग्रह धरल्याने त्यांनी फिर्याद केली.
-पोलिसांनी दिलेल्या निरोपानुसार प्राचार्यांनी फिरोज यांना पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले तेव्हा, ड्युडी संपवून बाहेर असलेले फिरोज कोणतेही आढेवेढे न घेता स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले होते.
मूळचे पंजाबमधील असलेले पीडित मुलीचे कुटंब या घटनेनंतर नवी मुंबई सोडून पुन्हा अमृतसरला निघून गेले आहे. मात्र लैंगिक अत्याचार झालेली ही मुलगी जेमतेम ८-९ वर्षांची असूनही पोलिसांनी ‘पॉक्सो’ कायद्याखाली खटला का दाखल केला नाही, हे गूढ मात्र उलगडले नाही.
-अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला