तौक्ते चक्रीवादळ : फडणवीस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यास कौकण दौऱ्यावर

Maharashtra Today

मुंबई :- अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा तडाखा बसला आहे. या तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे आणि नागरिकांच्या घरांचेही नुकसान झाले आहे. रायगडसह, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तीन दिवसीय कोकण दौरा करणार आहेत.

तौक्ते चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) राज्याला मोठा तडाखा बसला आहे. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे कोकणातील आणि विशेषतः समुद्र किनारपट्टीवर असलेल्या भागात मोठे नुकसान झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्तांच्या मदतीची मागणी केली होती. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तेव्हाही फडणवीसांनी कोकण दौरा करत नुकसानाची पाहणी केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोकणाचा दौरा केला होता. तेव्हा ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांसाठी मदतीची घोषणा केली होती. यावेळी केलेली मदत नागरिकांना तोकडी पडली होती आणि तिही वेळेत मिळाली नव्हती, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

नुकसानग्रस्तांच्या मदतीची मागणी

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आल्यावर राज्य सरकारने जी मदत जाहीर केली, ती एकतर तोकडी होती आणि तीही मिळाली नाही. तौक्ते वादळानंतर नुकसानीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने भक्कमपणे जनतेच्या पाठिशी उभे रहायला हवे!”

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button