तौक्ते चक्रीवादळ ; धोका कमी झाला असला तरी मदतकार्य वेगाने सुरू ठेवा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई :- तौक्ते चक्रीवादळामुळे (Tauktae cyclone) मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी थैमान घातले आहे. चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी, मुंबई, पालघरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आढावा घेतला. वादळाचा धोका कमी झाला असला तरी मदतकार्य वेगाने सुरू ठेवा. परिस्थिती पूर्वपदावर आणा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी तसेच सर्व यंत्रणांना दिले.

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत कालच्या दिवसात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यांमुळे अनेक झाडं किंवा झाडांच्या मोठमोठ्या फांद्या तुटून पडल्या. यामध्ये काही जणांना प्राण गमवावे लागले, तर कोणाला गंभीर दुखापत झाली आहे.

चक्रीवादळाचे संकट राज्यावर घोंघावत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतत यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेतला. शिवाय यंत्रणांना योग्य निर्देशही दिले. फोन, दूरदृश्य प्रणाली अशा विविध माध्यमांतून त्यांनी दिवसभर स्थानिक यंत्रणांशी संपर्क सुरूच ठेवला.

कोकण विभागीय आयुक्त तसेच जिह्यांच्या जिल्हाधिकाऱयांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने माहिती घेत होते. चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाऊस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि यंत्रणा सज्जच ठेवा. रस्त्यावरील पडलेली झाडे, पडलेले विजेचे खांब तातडीने काढून तसेच अगदी गावांपर्यंत जाणारे अंतर्गत रस्तेही मोकळे करून वाहतूक सुरू राहील याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मच्छीमारांच्या काही बोटींचे नुकसान झाल्याबाबतही त्यांनी माहिती घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सबंधित जिह्यांच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनाही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

ही बातमी पण वाचा : ‘तौक्ते’ चक्रीवादळावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, २ हजार ४२० नागरिकांचं स्थलांतर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button