Tata-Mistry Case : सायरस मिस्त्रींना न्यायालयाचा दणका; टाटा सन्सला दिलासा!

Tata Sons - SC - Maharastra Today

दिल्ली :- गेल्या तीन वर्षांपासून टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सुरू असलेल्या न्यायालयीन संघर्षांत सुप्रीम कोर्टाने आज महत्वाचा निर्णय दिला. मात्र, या वादात सर्वोच्च न्यायालयाकडून टाटा सन्सला मोठा दिलासा मिळाला आहे. सायरस मिस्त्री यांना कंपनीच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्त करण्याच्या ‘नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल’च्या (NCLT) निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. NCLTने २०१९ मध्ये आपल्या निर्णयात मिस्री यांना पुन्हा कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याचा निर्णय दिला होता.

NCLTने दिलेल्या निर्णयानुसार टाटा समूहाने सायरस मिस्त्री यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. आज या प्रकरणाची सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए.एस. बोपण्णा, न्यायमूर्ती व्ही. सुब्रह्मण्यम यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल १७ डिसेंबर २०२० रोजी राखून ठेवला होता. न्यायालयाच्या खंडपीठाने मिस्त्री यांना कंपनीच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय कायम ठेवला. परंतु शेअर्स प्रकरणी टाटा आणि मिस्त्री या दोन्ही समुहांनी एकत्ररित्या मार्ग काढण्यासही न्यायालयाने सांगितले.

यापूर्वीचा निकाल काय?

सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्षपद पुन्हा देण्यात यावे, असा निर्णय यापूर्वी न्यायाधिकरणाने दिला होता. त्यांच्या जागी एन.चंद्रशेखर यांची करण्यात आलेली नियुक्तीही बेकायदेशीर ठरवण्यात आली होती. दरम्यान, या विरोधात दाद मागण्यासाठी टाटा सन्सला न्यायाधिकरणाने चार आठवड्यांचा कालावधी दिला. त्यानंतर टाटा सन्सकडून सर्वोच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान देण्यात आले.

२०१६ मध्ये मिस्त्रींची हकालपट्टी

२०१२ मध्ये सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्याकडून अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. परंतु त्यानंतर ऑक्टोबर २०१६मध्ये मिस्त्री यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर २०१७मध्ये त्यांना टाटा सन्सच्या संचालक पदावरून आणि समूहातील अन्य पदांवरूनही काढण्यात आले. या निर्णयाविरोधात मिस्त्री यांनी २०१७मध्ये राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरणाकडे दावा दाखल केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER