खाजगी रूग्णालयातील प्रसुती सेवा सुधारण्यासाठी ‘लक्ष्य मान्यता उपक्रम’- आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे

eknath shinde

मुंबई :- माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी व खाजगी रुग्णालयातील प्रसुती सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘लक्ष्य मान्यता’ उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून प्रसुती सेवेचा दर्जा अधिक उंचावेल, अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

सार्वजनिक आरोग्य विभाग व फेडरेशन ऑफ ऑबस्टेट्रिक अँड गायनॉकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया (फॉग्सी) यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्य मान्यता उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याचा शुभारंभ नुकताच पुण्यातील औंध जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

ही बातमी पण वाचा : नागपूर मेडिकल रुग्णालायच्या अधिष्ठातापदी डॉ. मित्रा यांची नियुक्ती!

प्रसुतीदरम्यान आणि प्रसुतीपश्चात गुणात्मक सेवा

याबाबत अधिक माहिती देताना श्री. शिंदे म्हणाले, राज्यातील महिलांच्या सुरक्षित प्रसुतीसाठी तसेच खाजगी संस्थांमध्ये सेवांचा दर्जा सुधारून प्रसुतीदरम्यान होणाऱ्या माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी लक्ष्य मान्यता उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रसुतीदरम्यान आणि प्रसुती पश्चात गुणात्मक सेवा उपलब्ध करून माता व नवजात बालकांचे होणारे मृत्यू कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

‘लक्ष्य मान्यता’ दर्जात्मक सेवा मानांकनाचा अवलंब करण्यासाठी नोंदणीकृत रूग्णालयांना दर्जात्मक सेवेच्या 26 मानकांवर आधारित रूग्ण काळजी, सुरक्षितता, गुणवत्ता व सुविधा सुधारणे याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. खाजगी प्रसुती रुग्णालयांमध्ये गुणवत्ता मानकांना चालना देण्यासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असून या उपक्रमामुळे माता व बालकांना गुणात्मक सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते या उपक्रमाच्या बोधचिन्हाचे आणि संकेतस्थळाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.