‘रश्मी रॉकेट’च्या शेवटच्या शूटिंग शेड्यूलसाठी तापसी पन्नू पोहोचली भूजमध्ये

Rashmi Rocket

साऊथमध्ये अभिनयाच्या बळावर स्वतःच्या नावाचा डंका वाजवल्यानंतर तापसीने बॉलिवुडमध्ये प्रवेश केला आणि येथेही चांगले यश मिळवले. नायिकाप्रधान सिनेमे बॉलिवुडमध्ये फार कमी बनतात. परंतु जे बनतात त्यासाठी तापसीच्या नावाचा विचार केला जातो हेच तिने इंड्स्ट्रीमध्ये कमवलेले यश आहे. असाच एक नायिकाप्रधान सिनेमा आहे ‘रश्मी रॉकेट’. खरे तर गेल्या वर्षीच हा सिनेमा रिलीज होणार होता पण कोरोनामुळे त्याचे शूटिंग होऊ शकले नव्हते. आता लॉकडाऊननंतर सिनेमाचे शूटिंग सुरु झाले असून तापसीने एक शेड्यूल पूर्णही केले होते. आता तापसी दुसऱ्या आणि शेवटच्या शेड्यूलसाठी भुजला पोहोचली आहे.

‘रश्मी रॉकेट’ (Rashmi Rocket)मध्ये तापसी एका धावपटूची भूमिका साकारत आहे. ही धावपटू भुजमधील असल्यानेच भुजमध्ये शूटिंग केले जात आहे. या भूमिकेसाठी तापसीने प्रचंड घाम गाळलेला आहे. धावपटू दिसावे यासाठी अनेक महिने तिने जिममध्ये ट्रेनिंग घेतली आहे. यात अगदी पुलअप्सपासून हेवी डम्बेल्स उचलण्यापर्यंत तिने मेहनत घेतली आहे. एवढेच नव्हे तर तिने या भूमिकेसाठी वजनही कमी केले आहे. याबाबत बोलताना तापसीने सांगितले होते, पडद्यावर धावपटू म्हणून येताना प्रेक्षकांना ती धावपटू वाटली पाहिजे. उगाचच एखादी भूमिका साकारायची म्हणून मी साकारत नाही. त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न मी करते. मला पूर्ण खात्री आहे की माझी ही रश्मी रॉकेट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असेही तापसीने म्हटले होते.

दोन वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘सांड की आंख’ मध्ये तापसीने वयोवृद्ध निशानेबाज महिलेची भूमिका साकारली होती. यात तिच्यासोबत भूमी पेडणेकरही होती. त्यानंतर तापसीने ‘थप्पड’ सिनेमातूनही एका वेगळ्या विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता. प्रेक्षकांनी या दोन्ही सिनेमांना चांगला प्रतिसाद दिला होता. आणि आता ‘रश्मी रॉकेट’मधून तापसी आणखी एका खेळाडूचे जीवन पडद्यावर आणत आहे. भुजमध्ये सिनेमाच्या सेटवर पोहोचल्यानंतर लगेचच तेथील एक फोटो सोशल मीडियावर टाकला. हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत तापसीने लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत असून टीशर्टच्या पाठीवर भुज लिहिलेले दिसत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आकर्ष खुराणा करीत असून रॉनी स्क्रूवाला याची निर्मिती करीत आहे. यावर्षी हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER