अजय देवगणने मानले ‘मनसे’ आभार; ‘तान्हाजी’ मराठीत होणार डब

Tanhaji

मुंबई : ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा हिंदीत बनलेला चित्रपट आहे. हिंदी भाषेतील चित्रपट मराठीत डब करून प्रदर्शित करण्याला मनसे चित्रपट सेनेचा विरोध असतो. मात्र ‘तान्हाजी’ हा चित्रपट यासाठी अपवाद ठरला आहे . आता हा चित्रपट जगभरातील भाषांमध्ये डब करून प्रदर्शित करण्याची इच्छा मनसे चित्रपट सेनेने व्यक्त केली आहे.

त्यामुळे अभिनेता अजय देवगणने मनसेचे आभार मानत ‘तान्हाजी’ हा चित्रपट हिंदीसोबतच मराठीत डब करणार असल्याचे जाहीर केले. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांचं ट्विट रिट्विट करत अजयने आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात नरवीर तानाजी मालुसरे यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

शिवाजी महाराजांच्या सैन्यातील तानाजी मालुसरे हे अत्यंत पराक्रमी आणि विश्वासू साथीदार होते. ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि अजयही तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’चा ट्रेलर काल रिलीज झाला. हा ट्रेलर अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे.