‘तांडव’ने मला ‘ही’ गोष्‍ट करण्‍याची संधी दिली – सैफ अली

Saif Ali Khan - Tandav

गेल्या काही वर्षांपासून विशेषतः करीनाशी (Kareena Kapoor) लग्न केल्यापासून सैफ अली (Saif Ali Khan) बॉलिवुडमध्ये (Bollywood) बऱ्यापैकी यश मिळवू लागलेला आहे. त्याचे सिनेमे हिट होत असल्याने त्याच्याकडे अनेक नवीन सिनेमे येऊ लागले आहेत. केवळ अभिनयच नव्हे तर त्याने सिनेमा निर्मितीतही पाऊल टाकले आहे. सैफ हा असा कलाकार आहे ज्याची पत्नी करीना बॉलिवुडमधील सुपरस्टार अभिनेत्री आणि त्याची मुलगी सारा अलीही (Sara Ali Khan) आता बॉलिवुडमध्ये दमदारपणे पाऊल टाकू लागली आहे. सुरुवातीला जे यश सैफला मिळाले नाही ते त्याला आता मिळू लागले आहे. केवळ सिनेमाच नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही त्याने पदार्पण केले आणि त्यातही यश मिळवले. त्याची तांडव (Tandav) ही नवी वेबसीरीज आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने त्याने आमच्याशी साधलेला संवाद.

सिनेमा किंवा वेब सीरीज निवडताना तू कशावर जास्त लक्ष देतोस?

मला ऑफऱ केलेली भूमिका किती महत्वाची आहे ते मी पाहातो. मुख्‍य भूमिका साकारणे मला आवडते. तसेच माझा स्क्रीन टाइम किती आहे तेसुद्धा मी पाहातो आणि त्यालाही महत्त्व देतो. स्क्रीन टाईम कमी जरी असला आणि भूमिका जबरदस्त असली तरी प्रेक्षकांवर त्याचा परिणाम होतो हे आजवर सिद्ध झालेले आहे. त्यामुळे मी भूमिका निवडताना भूमिका किती महत्वाची आहे ते पाहातो.

प्रेक्षकांना तुझ्या या नव्या वेबसीरीजची प्रचंड उत्सुकता आहे. ‘तांडव’चा टीझर जोरदार होता.

हो खरे आहे. ‘तांडव’चा टीझर प्रेक्षकांना खूपच आवडला होता. टीझरमुळे आणि त्यातील माझ्या डायलॉगमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. आणि मी निश्चितपणे सांगतो की ही वेबसीरीज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. कारण प्रेक्षकांना जे हवे ते आम्ही यात देण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्या तू तुझ्या भूमिका काळजीपूर्वक निवडतोस. या भूमिकेचे वैशिष्ट्य काय आणि तू या भूमिकेसाठी तयारी कशी केली?

सुरुवातीला मी ज्या भूमिका माझ्याकडे आल्या त्या स्वीकारल्या होत्या. त्यात मी चूक केले असे म्हणणार नाही. कारण तेव्हा ती गरज होती. आता मात्र मी अत्यंत काळजीपूर्वक भूमिका निवडतो. हे गेल्या काही सिनेमातून तुला जाणवले असेलच. भूमिकेनुसार त्यासाठी तयारी करावी लागते. यात मी समर नावाच्या एका राजकारणी नेत्याची भूमिका साकारत आहे. त्यामुळे राजकारणी कसे वागतात, बोलतात याचा मी अभ्यास केला. तसेच राजकारणी चांगले हिंदी बोलत असल्याने मी चांगले हिंदी बोलण्यावर भर दिला आहे. एवढेच नव्हे तर यात मला संस्कृतही बोलावे लागले आहे आणि त्यासाठी मी संस्कृतची शिकवणीही घेतली होती.

‘तांडव’चे शूटिंग तुझ्या पतौडी पॅलेसमध्‍ये करण्याचे कारण काय?

पतौडी पॅलेस हा राजवाडा आहे. एखाद्या मोठ्या राजकारणाच्या वास्तव्यासाठी असा मोठा राजवाडा सूट होतो. त्यामुळे निर्मात्यांनी मला पतौडी पॅलेसमध्ये शूटिंग करूया का असे विचारले असता मी लगेचच तयार झालो. याठिकाणी मी माझ्या जीवनातील मोठा काळ घालवलेला आहे. ते माझे घर असल्याने तेथे शूटिंग करणे मला खूपच आरामदायक वाटले. येथे यूनिटला राहाण्याची संपूर्ण सोय असल्याने आम्हाला जास्तीत जास्त शूटिंग करता आले.

ओटीटी माध्यमात प्रवेश करून या नव्या ट्रेण्‍डचा भाग असणे सिनेमातील करिअरसाठी धोकादायक वाटत नाही?

माझ्या मते, कॅमे-यासमोर असणे हेच मोठे काम आहे. मग तो सिनेना असो वा वेबसीरीज. काम काम आहे. दोन्हीकडे मला अभिनयच करायचा असतो. त्यामुळे मी या दोन्हीकडे एकाच नजरेने बघतो. एखादी वेबसीरीज एखादा चांगला दिग्‍दर्शक दिग्‍दर्शित करीत असेल आणि निर्माता भरपूर पैसे टाकत असेल तर त्याची ट्रीटमेंट ही एखाद्या सिनेमासारखीच असते. ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये नवीन प्रयोग करण्‍याची संधी मिळते म्हणून मी या दोन्ही क्षेत्राकडे समान नजरेने पाहतो. यात धोका नसून उलट चांगला परिणाम होऊ शकेल.

राजकारण्यांकडे खलनायक म्हणून बघितले जाते. राजकारण आणि राजकीय नेत्यांबाबत तुझी मते काय आहेत?

‘तांडव’ हा राजकीय ड्रामा असून प्रेक्षकांना यातील थरार निश्चितच आवडेल. आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात राजकारणाबाबत सर्वाधिक चर्चा केली जाते. आपला देश जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. लोकशाहीशी संबंधित ही एक काल्‍पनिक राजकीय कथा आहे. राजकारणात नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही गोष्टी असतात. एखादा माणूस यशासाठी काय काय करतो ते राजकारणी दाखवून देतात. सिनेमामध्ये मी नकारात्‍मक भूमिका साकारल्‍या आहेत. त्‍या साकारण्‍याचा एक वेगळाच आनंद असतो. सकारात्‍मक भूमिका साकारण्‍यापेक्षा नकारात्मक भूमिका या आव्हानात्मक असतात. त्यात अधिक प्रयोग करता येतात. आणि त्यात मला आनंदही होतो. त्यामुळे राजकारणी व्यक्तीची नकारात्मक भूमिका साकारण्यातही गंमत आहे असे मला वाटते.

दिग्‍दर्शक अली अब्‍बास जफरसोबत काम करण्‍याचा अनुभव कसा होता?

अली नेहमी भव्यतेचा विचार करतो. त्याच्या कथांमध्ये नेहमीच वेगळेपणा असतो. मी त्याच्याबरोबर ‘टशन’ सिनेमात काम केले आहे. तेव्हापासून आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. मला ज्या दिग्दर्शकांबरोबर मनापासून काम करावेसे वाटते त्यापैकी तो एक आहे. काय आणि कसे दाखवायचे, त्याचा प्रेक्षकांवर काय परिणाम होईल हे त्याला चांगले ठाऊक असते. त्यामुळे त्‍याच्‍यासोबत काम करताना चांगले वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER