मंत्रिपद हुकल्याने तानाजी सावंतांची नाराजी पुन्हा उघड; घेतली पक्षविरोधी भूमिका

Tanaji Sawant

उस्मानाबाद :- मंत्रिपद न मिळाल्याची खंत मनात आद्यपही कायम असलेले शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा आमदार प्रा. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली आहे. उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्वतःच्या पक्षाचे खासदार, आमदार व नगराध्यक्ष यांच्याविरोधात भूमिका घेत त्यांनी आपली नाराजी जाहीर केली. प्रा. सावंत महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस हजर झाले होते. पण त्यांच्या भूमिकेवरून ते विरोधी पक्षाच्याच मानसिकतेत असल्याची चर्चा रंगली होती.

कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाच्या प्राधान्यक्रमात कळंब तालुक्‍यातील दुधाळवाडी व तुळजापूर तालुक्‍यातील रामदरा साठवण तलावापर्यंतच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे. सरकारचा अभिनंदनाचा ठराव मांडण्याचा मुद्दा नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी मांडला. त्याला विरोध करीत खासदार व आमदार यांच्यामुळे हे काम झालेले नसल्याचा दावा या वेळी प्रा. सावंत यांनी केला. शिवाय जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचाही या कामाशी सबंध नसल्याचे सावंत यांनी सांगितले. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)  नेते बुचकळ्यात पडले.

दरम्यान, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी सावंत यांना त्यामध्ये तुमचेही नाव असल्याची आठवण करून दिली. तरीही सावंत हे ऐकायला तयार नसल्याचे दिसून आले. याशिवाय शिवसेनेची नगरपालिका असलेल्या उस्मानाबाद पालिकेच्या कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही प्रा.सावंत यांनी यावेळी उचलून धरली. नगरपालिकेच्या कामामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी केला. ज्या व्यक्तीला पक्षात प्रवेश देऊन नगराध्यक्षपदाची उमेदवारी प्रा. सावंत यांनी दिली त्यांच्याविरोधातच त्यांनी आज आरोप केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

आजची बैठक म्हणजे निव्वळ राजकीय करमणूक असल्याचे पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ७५लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या कारंजाच्या कामातूनही बैठकीत गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी महाविकास आघाडी सरकारचा अभिनंदनाचा ठराव मांडला. जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय दिल्याबद्दल त्यांनी सरकारच्या  अभिनंदनाचा ठरवा मांडला. स्त्री रुग्णालयासाठी २०० खाटांच्या रुग्णालयाची मागणीही त्यांनी या वेळी केली.

या सभागृहात तरी राजकारण नको :  आजच्या बैठकीत नेत्यांच्या हेव्यादाव्यांवरून पालकमंत्री शंकरराव गडाख नाराज झाले. मागास असलेल्या जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत भूमिका घेण्याची क्षमता असताना येथे वेगळ्याच गोष्टीसाठी संघर्ष पाहायला मिळत आहे. विकासासाठी भूमिका घेण्याची गरज असून किमान या सभागृहामध्ये तरी राजकारण नको, अशी विनंती त्यांनी या वेळी केली.

ही बातमी पण वाचा : ‘ठाकरे’ सरकारने पद्म पुरस्कारासाठी संजय राऊंतांच्या नावाची केली होती शिफारस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER