‘मातोश्री’ची भीती संपली

badgeमहाविकास आघाडीचा कारभार एकदम बिनधास्त आहे. इथे कुणी कुणाला मोजत नाही, घाबरत तर अजिबात नाही. भिन्न विचारसरणीच्या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार बनवले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. नाराजी, बंड, नेत्यांचे न ऐकणे हे प्रकार तर रोजचे झाले आहेत. सर्वांना मंत्रिपद देता येणे शक्य नाही हे ठाऊक असताना नाराजांचे मोठे पीक आले आहे. एखादा बंडोबा थंड होत नाही तोच दुसरा उभा राहतो. नाराजी दूर करण्यासाठी उद्धव सात नवी खाती निर्माण करीत असल्याचे ऐकले. त्यांनी ‘नाराजांची नाराजी’ दूर करण्यासाठी स्वतंत्र ‘नाराज खाते’ सुरू करावे. म्हणजे नाराजांची सोय होईल, उद्धव यांचे टेन्शनही दूर होईल.

राष्ट्रवादीत नाराज होण्याचे धाडस केवळ अजितदादा पवार हेच करू शकतात. त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे राष्ट्रवादीत आनंदीआनंद आहे. काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचे बंड पाच दिवस चालले. चणेफुटाण्याचे खाते मिळाले म्हणून रुसून बसलेले वडेट्टीवार यांची समजूत काढण्यासाठी बाळासाहेब थोरात यांना दिल्लीला सोनिया यांच्या दरबारी धावावे लागले. ह्यावरून किती गोंधळ सुरु आहे याचा अंदाज येतो. पूर्वी ‘मातोश्री’, उद्धव ठाकरे यांची सेना नेत्यांना भीती वाटायची. तसे आता राहिलेले नाही. मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचे माजी मंत्री मराठवाड्याचे आमदार तानाजी सावंत प्रचंड नाराज आहेत. उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला साथ करीत त्यांनी आपल्या पुतण्याला उपाध्यक्ष बनवले. उद्धव त्यांची हकालपट्टी करतीलही. पण आजतरी उद्धव शांत आहेत. याचा अर्थ शिवसेनेत असे अनेक ‘तानाजी’ आहेत. बंडखोरीचे लोण पसरू नये म्हणून उद्धव ‘थंडा कर के खाओ’ ही काँग्रेसची नीती चालवताना दिसत आहेत.

‘हा खेकडा शिवसेना पोखरतोय, वेळीच नांग्या मोडा,’ उद्धव ठाकरेंकडे मागणी

महाआघाडीतले आमदारच स्वतःला ‘दिल के राजा’ समजत नाहीत. दोन काँग्रेसच्या सरकारमध्ये कुरघोड्या चालायच्या. इथे कुरघोड्या सुरु व्हायच्या असल्याने तीन पायांच्या आघाडीचे नेते बिनधास्त आहेत. खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कुणाच्या ध्यानीमनी नसताना ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी अशी केंद्र सरकारला शिफारस करणारा ठराव मांडून उद्धव यांनाच नव्हे तर अजितदादा यांनाही चकित केले. तिन्ही पक्ष एकमेकांना सांभाळून घेत असल्याने आजतरी सरकारला धोका नाही. लहरी नेते असले तरी सरकार पाच वर्षे चालेल. कारण इथे कुणी कोणाला अडवताना दिसत नाही. कुणी कुणाला घाबरत नाही.