छेडछाड: टाइमपास की मनोविकृती

Tampering-Timepass psychosis

छेडछाड (Tampering)किंवा ज्याला ईव्ह टीजिंग म्हटलं जातं, त्याचा अर्थ लैंगिक गैरवर्तन , हिंसा किंवा गुन्हेगारी असाच घ्यावा लागेल.

या विषयी सविस्तर लेख लिहावासा वाटला कारण , मागच्या महिन्यात मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) बारा वर्षाच्या मुली बरोबर केलेले लैंगिक गुन्ह्याचे वर्तन केवळ गैरवर्तन या सदरात मोडते असा निर्णय दिला. त्यामुळे जजचे कन्फर्मेशन ही रद्द झाले असे वाचनात आले. एकूण काय ,व्यवहारात महिलांना मग ती कुठल्याही वयाची ,आर्थिक ,सामाजिक स्तरातील असो कुणालाही याला बळी पडावं लागतं. आणि अगदी वाईट आर्थिक स्थिती ,अशिक्षित, असंस्कारित व्यक्तींपासून चांगल्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक उच्च स्तरातील, कित्येक वयाने मोठी माणसं केवळ टाइमपास वा जाता जाता असे वर्तन करतात. एक तर पकडले जाण्याची शक्यता फारच कमी असते त्यांच्या बाबतीत.

मग जागा कुठली का असेना !ऑफिसेस ,रस्ते ,बसेस ,लोकल्स, बस स्टॉप किंवा घरही ! त्यासाठी नेहमी मुलींचे ड्रेसेसवर आरोप केला जातो. पण पूर्ण नखशिखांत पोशाख घातलेल्या स्त्रीला हे सहन करावाच लागतं. अशावेळी मुली महिला एकट्या असल्या तर मान खाली घालून निघून तरी जातात, थोडी गर्दी असेल तर निषेध दर्शवतात .परंतु पोलिसात तक्रार केल्यानंतरची प्रोसेस ही सोपी नाही. नको ते प्रश्न पोलीस विचारतात, त्या वेळी ती मुलगी तेवढी stable आणि confidant असायला लागते .पुन्हा आरोपीला अटक झाली तर खटला ,आरोप सिद्ध होणे ,शिक्षा यामध्ये खूप वेळ जाऊन मुली कंटाळून जातात, शिवाय मानहानी होते ती वेगळीच. त्यामुळे गुन्हे नोंदवल्याच कमी जातात. शिक्षाही अत्यल्प ,त्यामुळे आपण पकडले जाणार नाही हा विश्वास निर्माण होतो.

या सगळ्या टाइमपास मध्ये महिलांच्या शरीराला स्पर्श करण्याची गरज नसते. तर ऐकू जाईल असे अचकट विचकट बोलणे, अश्लील हालचाली, इशारे ,हावभाव ,गलिच्छ चित्रे दाखवणे, टक लावून बघणे इत्यादी प्रकार यातूनही त्रास देण्याचा उद्देश साध्य होऊ शकतो .या अस्पर्श प्रकारामुळे ही तितकाच मानसिक त्रास होतो आणि झुंडीच्या मानसशास्त्रतून घडणाऱ्या या प्रकाराला एकटी दुकटी महिला प्रतिकार करू शकत नाही.

यामागे केवळ पुरुषी मानसिकताच आहे का? समोरच्या व्यक्तीला त्रास होईल लाज वाटेल आणि ते सहन करावाच लागेल कारण की त्याला पर्याय नाही म्हणून ?इतका विकृत आनंद ?आणि पकडल्या गेलोच तर तिचं कशी वाईट या उलट्या बोंबा !

गुन्हेगारी ही आजच्या समाजासमोरील एक जटिल समस्या आहे .ही प्रवृत्ती वाढल्याने गुन्हेगारीचे मानसशास्त्र ही एक महत्त्वाची मानसशास्त्रीय उपशाखा निर्माण झाली. गुन्हे शास्त्राचा जनक लोंब्रोसो, याशिवाय पॉल टप्पन, मायकेल ॲडलर यांनी याबाबत बराच अभ्यास केला.

त्यांच्या मते ,”कोणत्याही औचीत्या शिवाय जाणीवपूर्वक केले जाणारे असे कार्य अथवा वर्तन गुन्हेगारी कायद्याचे उल्लंघन करते ते कार्य किंवा वर्तन म्हणजे गुन्हा.”म्हणजेच गुन्ह्याची वैशिष्ट्ये बघताना गुन्हा हा समाज वा व्यक्ती विरोधी असतो. कोणते तरी कायद्याचे व सामाजिक मानदंड यांचे उल्लंघन करणारे वर्तन असा असतो. आणि मुख्य गुन्ह्याच्या मुळाशी जैविक, आर्थिक, व्यावसायिक सामाजिक व मानसिक अशा विविध प्रेरणा असू शकतात.

आणि स्त्री हिंसाचाराची व्याख्या म्हणजे स्त्रियांवर कोणत्याही प्रकारे मानसिक शारीरिक लैंगिक छळ करणे म्हणजे हिंसाचार अशी व्याख्या केलेली आहे. मग या पार्श्वभूमीवर स्त्रियांवरील लैंगिक गुन्ह्यांबाबत विचार करताना किंवा त्याची कारणं शोधतांना येब्लोंस्की यांनी गुन्हेगारांचे व्यावसायिक व मनोविकृत असे दोन प्रकार सांगितले आहेत.

पहिल्या प्रकारात गुन्हेगारांचे उद्दिष्ट निश्चित असून हे नियोजन बद्ध गुन्हे विशिष्ट पद्धतीनेच करतात. मात्र मनोविकृती गुन्हेगारांचा उद्देश व्यावसायिक व आर्थिक प्रेरणेमुळे नसतो तर मनोविकृतीतुंच गुन्हा घडतो .विकृत समाधान प्राप्तीसाठी किरकोळ किमतीच्या वस्तूही ते चोरतात. कोलमन या शास्त्रज्ञांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कारणांचा शोध घेऊन गुन्हेगारांचे सहा प्रकारात वर्गीकरण केले. १) जैविक २) मतिमंद ३) मनोविकृत ४) नस विकृत. ५) समाज विरोधी ६) अप सांस्कृतिक.
याशिवाय जीवशास्त्रीय न्यूनता तसेच अनुवंशिकता हे पण एक कारण सांगितले जाते पण ते तितकेसे बरोबर नाही. परिसराचा काही परिणाम होत असतो. काहीजण मानसिक दडपणाला असणारी प्रतिक्रिया म्हणून गुन्हेगारीकडे बघतात, तर काही मनो दुर्बलतेला प्रमुख कारण म्हणून समजतात. भावनिक समस्या आणि गुन्हेगारी, पालक आणि बालक तणावपूर्ण संबंध, आत्यंतिक दुःखी, असमाधानी आणि ताणतणाव निर्माण करणाऱ्या परिस्थितीत जगत असलेले असेही गुन्हेगारीकडे वळलेल्या दिसतात. याशिवाय आर्थिक, सामाजिक ,कौटुंबिक कारणे असली तरीही राफ्ट यांच्या अभ्यासानुसार” समाज विरोधी व्यक्तिमत्व विकृती” ही स्त्रियांवरील शारीरिक आणि मानसिक हिंसेमागे आढळली. या व्यतिरिक्त अल्प आत्मसन्मान असलेल्या व्यक्ती, असहाय महिला वर्गावर अत्याचार करून आत्मसन्मान उंचावण्याचा प्रयत्न करतात. वैवाहिक समायोजन, वडिलांच्या वर्चस्व वृत्तीचे अनुकरण हेही यामागे दिसून येते.

परंतु यापलीकडे अनेक सॅक्शुअल दिसोर्डरस मधून अशा कृती घडू शकतात. उदाहरणार्थ. फ्रोट- रिझम्, एक्झिबिशनिझम, व्होयेरिस्टिक, sexual sadism,याशिवाय टेलिफोन स्कटोलोजिया, व्हिडिओ व्हायोरिझम यासारखे नवे प्रकारही या विकृतीत आढळतात.

यासाठी स्त्री शिक्षण, कायद्याचे ज्ञान. उदाहरणार्थ लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा, प्रसारमाध्यमांवर ही मोठी जबाबदारी आहे ,त्याचप्रमाणे स्त्री संघटनाचा सहभाग, याशिवाय मनोवृत्ती तील बदल म्हणजे मागील एका लेखामध्ये म्हटल्याप्रमाणे पुरुषी आक्रमकता ही जैविक नाही तर पुरुष म्हणून वाढवताना जाणीवपूर्वक स्त्रियांना योग्य समानतेचे सन्मान देण्याचे संस्कार घडवणे गरजेचे आहे. मनोविकृतीवर मनोविकार तज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन तसेच मानसोपचार तज्ञांचे उपचार गरजेचे आहेत.

याशिवाय केवळ शिक्षणासाठी शिक्षा किंवा इतरांना धाक बसावा म्हणून, गुन्हा करण्यास प रत धजावणार नाही अशी शिक्षा आता असंस्कृत व कालबाह्य ठरली आहे. याने एखादा नवखा गुन्हे गुन्हेगार अटल गुन्हेगारीकडे वळू शकतो. म्हणून मानसिकतेत व वृत्तीत सकारात्मक बदल करणारी, आपली चूक सुधारण्यास मदत करणारी शिक्षा हवी. प्रत्येक घराघरातून पाल्यांना घडवणाऱ्या पालकांची आज या बाबतीत खूप मोठी जबाबदारी आहे हेच खरं !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER