ताम्बूलसेवन – जेवणानंतर अवश्य आरोग्यकारक विडा उचलावा !

Tambulsevan

विड्याचे पान हे सणावाराच्या दिवशी, जड जेवण झाल्यास किंवा समारंभ असल्यास हमखास तयार केले जाते. बऱ्याच जणांच्या घरी पानाचे तबक नेहमी तयार असते. जेवणानंतर एक पान हमखास बनविल्या जाते. काही जणांना वारंवार पान खाण्याची सवय खरं म्हणजे व्यसनच असते. आरोग्याच्या दृष्टीने पान खाणे किती योग्य, कोणते घटक असावे याचा विचार आयुर्वेदात देखील केला आहे.

नित्य दिनचर्येमधे जेवणानंतर ताम्बूल सेवन सांगितले आहे. विड्याची पानं, जायफळ, सुपारी, शीतलचीनी ( कंकोल), लताकस्तूरी, कर्पूर, वेलची, लवंग,चुना कत्था घातलेले ताम्बूल खाल्याने मुख स्वच्छ होते. ( घेतलेल्या अन्नाची निघून जाते.) भोजन पचायला मदत होते. तोंडाला दुर्गंध येत नाही. या तांबूलात सर्व सुगंधी द्रव्य असल्यामुळे मुखदुर्गंधी अथवा अन्नाचा वास येत नाही. असे वर्णन आचार्यांनी केले आहे. हनु, दात, स्वर, जिव्हा यांचे शोधन करते. तोंडात लाळ सुटणे कमी होते. तसेच पान हे हृदयाला हितकर असून गळ्यामधे होणाऱ्या विकारांना कमी करते.

तांबूलात वापरण्यात येणारे नागवेलीचे पान हे तीक्ष्ण उष्ण व तिखट कडू असते. सुगंधी, स्वर्य ( आवाज चांगला होण्याकरीता लाभदायक), मुखदुर्गंधता नष्ट करणारे, वातकफाचे शमन करणारे, मल विरेचक ( पोट साफ करणारे) असते.

पानामधे सुपारी जास्त झाल्यास लालीमा कमी येते. चूना जास्त झाल्यास पानाचा सुगंधी गुण कमी होतो.ताम्बूलात वापरण्यात येणारा काथ हा खदीर वृक्षापासून बनविलेला असेल तर तो आरोग्य कारक, मुखशुद्धी करणारा, प्रमेह मूत्ररोग कमी करणारा आहे. दंतरोग कण्ठरोग, टाळू कोरडी पडणे, कफरोगात कत्था औषधीप्रमाणे उपयुक्त आहे.

जायफळ सुगंधी भोजनात रुचि उत्पन्न करणारे, कफ कमी करणारे तसेच कण्ठरोग निवारक आहे. लवंग पाचन करणारी, आवाज बसणे – दंतरोग – अजीर्ण या विकारांवर उपयुक्त आहे.विड्याच्या पानाचा मूळभाग व्याधी उत्पन्न करणारा असतो म्हणून तो काढून टाकतात. तसेच अग्रभाग किंवा पानाचे टोक दोषकारक मानले आहे. म्हणूनच ताम्बूल बनवितांना त्याचे देठ टोक तसेच जाड शिरा काढून मगच पान बनवितात.

ताम्बूल सेवन आरोग्यकारक जरी असले तरीही काही अवस्था किंवा आजार असे आहेत की ताम्बूल सेवन निषिद्ध किंवा हानीकारक सांगितले आहे. नाक गुद मुख भागातून रक्तस्त्राव होणे, अतितहान लागणे, चक्कर येणे, क्षीण दुर्बल अशक्तपणा असल्यास, अतिसार रोग, भूक लागली असेल, दूध सेवनानंतर, नेत्ररोग, मदात्यय ( अति मद्यपान), अति परिश्रम करणारे तसेच पित्तविकार असणारे इ.

ताम्बूलाचे अति सेवनसुद्धा हानीकर आहे. काही जणांना वारंवार पान खाण्याची सवय असते. काही व्यक्ती तम्बाखु गुटखा सारखे घातक पदार्थ टाकून पान खातात. आयुर्वेदात सांगितलेल्या घटकांमधे कुठेही तम्बाखू गुटखा, गुलकंद साखर किंवा पान मसाला अशा पदार्थांचा उल्लेख नाही. यात सर्व सुगंधी उष्ण द्रव्येच आहेत जेणे करून भोजन पचेल व जिभेचा तोंडाचा चिकटपणा नष्ट होईल.

ताम्बूलाचे अति सेवन दात दुर्बल करतात. पिवळे लाल दात होणे, बलक्षय, मुखरोग मुखरुक्षता तोंड येणे असे व्याधी निर्माण होतात.

असे हे ताम्बूल सेवन योग्य पद्धतीने घेतल्यास आरोग्यकारक. असा योग्य पद्धतीने बनविलेला आरोग्याचा विडा प्रत्येकाने नक्कीच उचलावा.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER