आज शेतकरी का रस्त्यावर उतरला त्यावर बोला : संजय राऊत

Sanjay Raut & Devendra Fadnavis

मुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज (मंगळवार ८ डिसेंबर) भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. या आंदोलनावरून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) असा वाद पेटला आहे. ‘जर उत्खनन करण्याचे ठरवले तर खूप लांब जाता येईल, आज शेतकरी का रस्त्यावर उतरला त्यावर बोला.’ असं म्हणत शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फटकारले आहे .

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भारत बंदला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे.देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचे एपीएमसीबद्दलचे (APMC) जुने पत्र वाचून दाखवत जोरदार पलटवार केला होता. याबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ‘आता जर उत्खनन करायचे म्हटलं तर खूप लांबपर्यंत जाता येईल. १० वर्षांपूर्वीचे बोलू नका. शेतकरी आज रस्त्यावर आहे. ‘शेतकऱ्यांनो, रस्त्यावर या’ असं आवाहन शिवसेना, राष्ट्रवादी आणि तृणमृल काँग्रेसने केले नाही.

जो शेतकरी रस्त्यावर उतरला त्याला कुणाचेही पाठबळ नाही. कोणताही राजकीय पक्ष त्यांच्या बाजूने उभा नाही, शेतकऱ्यांच्या हातात कोणताही राजकीय झेंडा नाही. त्यामुळे विरोधी पक्षाने हे नीट समजून घेतले पाहिजे. आपण विरोधी पक्षनेते म्हणून काय भूमिका घेतोय याचा त्यांनी १० वेळा विचार केला पाहिजे’ असा सणसणीत टोला राऊत यांनी लगावला. हा भारत बंद राजकीय नाही. हा बंद शेतकऱ्यांच्या भावनांना पाठिंबा देण्यासाठी आहे.

ज्याच्या कष्टाचे अन्न आपण खातोय, त्याला पाठिंबा देण्यासाठी हा बंद आहे. त्यामुळे आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे  राहिले पाहिजे. शेतकऱ्यांना पाठिंबा देणे हा फक्त देशातल्या नाही तर जगातल्या नागरिकांचे कर्तव्य आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER