राजकुमार , लकी आली , करण जोहर आणि आलिया भट्टचे किस्से

Raajkumar - Lucky Ali - Karan Johar - Alia Bhatt

मृत्यूची बातमी लपवण्यास सांगितले होते राजकुमारने (Rajkumar)

पडद्यावर त्याची एंट्री झाली की लगेचच टाळ्या पडायला सुरुवात होत असे. तो डायलॉग काय मारतो याकडे सगळ्यांचे लक्ष असायचे. त्याचे डायलॉग्ज प्रेक्षक तोंडपाठ करीत असत. जिनके घर शीशे के होते हैं पासून ते यह चक्कू है बच्चों के खेलने का खिलौना नहीं असे त्याचे डायलॉग्ज आजही लोकप्रिय आहेत. असा हा आपल्याच मस्तीत जगणारा आणि सगळ्या दुनियेला आपल्या मुठीत ठेवणारा अभिनेता म्हणजे राजकुमार. बॉलिवूडमध्येही (Bollywood) तो कोणाची भीडभाड ठेवत नसे मग तो अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) असो वा धर्मेंद्र (Dharmendra). आपल्या कुटुंबाला त्याने आवर्जून चित्रपटसृष्टीपासून दूर ठेवले होते. असा हा मनमौजी अभिनेता शेवटच्या प्रवासाला निघाला तेव्हाही आपल्याच मस्तीत होता.

मरणापूर्वी राजकुमारने आपल्या पत्नी आणि मुलांना जवळ बोलावून शेवटची इच्छा सांगितली. त्याची शेवटची इच्छा ऐकून सगळेच चकित झाले. राजकुमारने आपल्या कुटुंबियांना सांगितले होते, माझा मृत्यू झाल्यानंतर कोणालाही याची माहिती देऊ नका. अंत्यसंस्कार झाल्यावरच कोणाला सांगायचे असेल तर सांगा असेही त्याने कुटुंबियांना बजावले होते. त्याच्या अत्यंत जवळच्या अशा दोन-तीन मित्रांनाच त्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आली होती. राजकुमारवर जेव्हा पंचत्वात विलीन झाला तेव्हाच सगळ्यांना त्याची माहिती देण्यात आली होती. असा होता एक राजकुमार.

यश चोप्रांना (Yash Chopra) नकार दिला होता लकी अलीने (Lucky Ali)

लकी अलीचे नाव आज अनेकांना ठाऊक नसेल. तो एक चांगला गायक, अभिनेता आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून तो बॉलिवूडपासून आपल्या व्यवसायात मग्न आहे. ऋतिक रोशनच्या (Hritik Roshan) पहिल्या ‘कहो ना प्यार है’ चित्रपटात लकीने ‘एक पल का जीना’ आणि ‘ना तुम जानो ना हम’ गाणी गाऊन प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. लकी अलीची आणखी एक ओळख म्हणजे तो प्रख्यात कॉमेडियन मेहमूदचा मुलगा. लकीने पिता मेहमूदसोबत लहानपणापासूनच चित्रपटात काम केले होते. परंतु अभिनयापेक्षा त्याला गीत-संगीताची खूप आवड होती त्यामुळे त्याने त्यातच जास्त लक्ष दिले. त्याने अनेक सोलो अलबमही रिलीज केले होते. लकी अलीचा आवाज चांगला असल्याने त्याला अनेक निर्माते गाण्यासाठी बोलवत असत.

यश चोप्रा यांनीही सलमान खान अभिनीत ‘सुलतान’ (Sultan) चित्रपटातील एक गाणे गाण्यासाठी लकी अलीला बोलावले होते. लकी अली ठरलेल्या वेळेवर यशराज स्टूडियोमध्ये (Yashraj Studio) गाणे रेकॉर्ड करण्यासाठी पोहोचला. परंतु गाण्याचे बोल वाचून तो नाराज झाला. त्याने तेथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना चांगलेच धारेवर धरले. यश चोप्रांचा चित्रपट, सलमान खानसारखा (Salman Khan) नायक आणि इतके फालतू बोल असलेले गाणे घेतलेच कसे असा प्रश्न तो सगळ्यांना विचारू लागला. मात्र त्याच्या नाराजीकडे लक्ष न देता सगळ्यांनी त्याला गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यावर दबाव टाकला. तेव्हा गाण्याचे बोल न आवडल्याने तो नाराज तर होताच त्यातच त्याच्यावर दबाव टाकल्याने तो रागानेच चक्क स्टुडियोतून निघून गेला. त्यानंतर यश चोप्रा यांनी ते गाणे दुसऱ्याकडून गाऊन घेतले.

आलियाच्या मैत्रीणीबरोबरच्या जेवणाचे बिल दिले करण जोहरने

करण जोहर (Karan Johar) नवीन कलाकारांना आपल्याकडे खेचून घेण्यात वाकबगार आहे. कुठे, कधी, काय केले म्हणजे हे कलाकार आपल्याकडे राहतील हे त्याला चांगले ठाऊक आहे. त्यामुळेच अनेक नवे कलाकार त्याच्यासोबत काम करताना दिसतात आणि त्याला मेंटॉरही मानतात. आलिया भट्टही त्याला आपला दुसरा पिताच मानते. मात्र आलिया करणच्या इतकी प्रेमात का पडली याचे कारण ऐकाल तर चकित व्हाल.

त्याचे झाले असे एकदा आलिया (Alia Bhatt) आपल्या मैत्रीणींबरोबर हॉटेलमध्ये जेवायला गेली होती. तेव्हा ती संघर्ष करीत होती. तर हॉटेलमधील या जेवणाचे बिल थोडे थोडके नव्हे तर चक्क दीड लाख रुपये झाले होते. आलियाकडे तर तेव्हा तेवढे पैसे नव्हते त्यामुळे तिने पिता महेश भट्टकडे पैसे मागितले तर ते रागावले. अशा छोट्या पार्टीसाठी इतकी मोठी रक्कम खर्च करणे त्यांना उचित वाटले नव्हते. आलिया आताच जर असे पैसे उडवू लागली तर तिच्याकडे नंतर पैसेच उरणार नाहीत आणि भविष्यात तिला याचा पश्चाताप होईल असा सूर महेश भट्ट यांनी काढला होता. करण जोहरही त्या हॉटेलमध्ये होता. त्याने आलियाची स्थिती पाहिली आणि लगेचच तिचे बिल भरून टाकले. एवढेच नव्हे तर जेव्हा कधी मृत्यूपत्र बनवेन तेव्हा तुझ्यासाठी काही संपत्ती ठेवेन असे आश्वासनही दिले. त्याची ही गुंतवणूक त्याला नंतर खूप फायदेशीर ठरली हे सांगायला नको.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER